Vividha Grahak Peth 2025

Back to Programs

"विविधा" ग्राहक पेठ – ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ (वर्ष तिसरे)

स्थळ : वाशी, नवी मुंबई

आयोजक : चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई


आपल्या ज्ञाती मधल्या बंधू भगिनींचा उद्योग व्यवसाय वृद्धिंगत व्हावा; तसेच उद्योजक / व्यावसायिकांची परस्परांशी ओळख वाढावी, व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून चित्पावन फौंडेशन प्रयत्नशील असते.

बरेचदा नव्याने उद्योग व्यवसायात पदार्पण करणाऱ्या बंधू भगिनींना एक व्यासपीठ मिळणे, मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते; त्या दृष्टीने फौंडेशनचा असा प्रयत्न असतो कि अशा उभरत्या उद्योग व्यावसायिकांसाठी जास्तीतजास्त संधी उपलब्ध करून देता येतील.
त्या दृष्टीने चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चे कोअर कमिटी चे सभासद नवनवीन कल्पना लढवत असतात आणि त्यांचा पाठपुरावाही करत असतात.

त्याप्रमाणे चित्पावन फौंडेशन, नवी मुंबईने ह्या वर्षी म्हणजे २०२५ च्या ९ ते १२ ऑक्टोबर रोजी "तामिळ संगम हॉल", आणि "कन्नड संघ हॉल", वाशी, नवी मुंबई येथे सकाळी १० ते रात्री ९ अशा वेळेत विविधा - ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकांच्या सोयीकरता दोन्ही हॉल मध्ये तळमजल्यावर स्टॉल उभारण्यात आले होते. दोन्ही हॉल च्या मधील भागात फूड स्टॉल ला जागा देण्यात आली होती.

"विविधा" ग्राहक पेठेचे २०२५ हे तिसरे वर्ष होते. पहिल्या दोन वर्षांचा दमदार प्रतिसाद पाहता आणि संभाव्य स्टॉल धारकांची वाढती संख्या लक्षात घेता दोन्ही हॉल चे तळमजले आरक्षित करण्याचे योजले होते. अपेक्षेप्रमाणे स्टॉल धारक आणि ग्राहकांनी हाही अंदाज खरा ठरवला, हे "विविधा" ला मिळलेल्या जोरदार प्रतिसादावरून सिद्ध झाले.

हॉल बुकिंग पासून ते ग्राहक आणि व्यावसायिक बंधू - भगिनींसाठी स्टॉल सुसज्ज करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, अशा सर्व बाबींची चोख व्यवस्था करण्यात आली होती. कोअर कमिटी च्या कार्यकर्त्यांनी अनेकदा समक्ष भेटून, चर्चा करून समन्वयाने "विविधा" ग्राहक पेठेची उत्तम तऱ्हेने आखणी केली होती. उद्योजक व्यावसायिक बंधू भगिनींचा भरपूर मोठ्या प्रमाणात व्यवसाय व्हावा ह्या दृष्टीने नव्या मुंबईत ठिकठिकाणी तसेच वेगवेगळ्या माध्यमातून जसे वर्तमानपत्र, कापडी बॅनर, तसेच अद्ययावत अशा डिजिटल मीडिया, व्हाट्स अँप, फेसबुक वगैरे माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली होती.

त्याचबरोबर वेळोवेळी झालेल्या कमिटीच्या मिटींग्स मध्ये हॉल बुकिंग, जास्तीतजास्त प्रमाणात किती स्टॉल बसवता येतील त्याचा लेआऊट, उद्योग व्यावसायिकांना डोईजड होईल असे भाडे न आकारता परवडेल अशा खर्चात कसे उपलब्ध करून देता येतील, जाहिरात खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्पॉन्सरशिप मिळवणे, जाहिरातीसाठी बॅनर मिळवणे, इत्यादी अनेक गोष्टींचा साकल्याने विचार केला होता.

ह्या वर्षीच्या "विविधा" साठी चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई ला मागील वर्षीप्रमाणेच "वामन हरी पेठे ज्वेलर्स" ह्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध ब्रँड चे युवा पिढीचे प्रतिनिधी श्री. नील पेठे ह्यांनी 'टायटल स्पॉन्सरशिप' म्हणून दोन लाख रुपयांची देणगी दिली.
"वामन हरी पेठे ज्वेलर्स" ची टायटल स्पॉन्सरशिप मिळविण्यासाठी श्री. संतोष नेने, डॉ. सौ. रसिका व श्री. विलास ताम्हनकर ह्यांनी तसेच "TJSB Sahakari Bank" ची को-स्पॉन्सरशिप मिळविण्यासाठी डॉ. श्री. आमोद ताम्हनकर ह्यांची मोलाची मदत झाली. श्री. कौस्तुभ गोखले ह्यांच्या मार्फत "पितांबरी" ह्या नामांकित समूहाकडून "विविधा" मध्ये स्टॉल्स करीता २५,००० देणगी स्वरूपात मिळाले.

श्री. अंकित मेहेंदळे (मे. मेहेंदळे ट्रॅव्हल्स) आणि श्री. अमित भिडे (M/s Roam Abound Hospitality) ह्यांच्या कडून "विविधा" साठी जाहिरातीचा बॅनर देण्यात आला होता.

ह्या सर्व स्पॉन्सरशिप्स मिळवण्यासाठी तसेच जास्तीतजास्त इच्छुक उद्योजक / व्यवसायिकांपर्यंत  पोहोचण्यासाठी कोअर कमिटीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

त्याचप्रमाणे, संबंधित अधिकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करून असे ठरवण्यात आले कि चित्पावन ब्राह्मण ज्ञाती बरोबरच इतर ब्राह्मण समाजाच्या हिताचा सर्वसमावेशक पद्धतीने विचार करून त्यांनाही "विविधा" ग्राहक पेठेत स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे. त्यामुळे अधिक विशाल दृष्टिकोनातून समस्त ब्राह्मण वर्गाच्या उन्नतीसाठी आपल्या संस्थेला समाजात एक चांगले उदाहरण बनून राहता येईल.

कन्नड संघ हॉल मध्ये (AC) १८, तामिळ संगम हॉल मध्ये ३० तसेच ४ खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. काही स्टॉल्स सिंगल टेबलं तर काही L स्वरूपात होते. अनेकविध वस्तू, सेवा पुरवणारे उद्योगजक, व्यावसायिक ह्यात समाविष्ट होते. जसे कि पुस्तके, पर्सेस, बॅग्स, औद्योगिक भेटवस्तू, पूजा साहित्य, साड्या, दिवाळी फराळ, पीठे, फ्रिज मॅग्नेट, ऑरगॅनिक हळद, साबण उटणी, रांगोळ्या, दिवे, तेल, क्रोशाची खेळणी, एम्ब्रॉयडरी प्रॉडक्ट्स, बेडशीट्स, कोकण मेवा, आंब्याचे विविध पदार्थ, लोणची, कुंड्या, इको टूरीजम, ट्रॅव्हल टूर, कार सर्व्हिसिंग, पेन्टिंग्स, ज्वेलरी, गुंतवणूक, इन्शुरन्स, हर्बल प्रॉडक्ट्स, पेन्टिंग्स, श्रीखंड, इत्यादी. तसेच चविष्ट व रुचकर असे अनेक ताजे खाद्य पदार्थ तयार करून देणारे स्टॉल्स ही होते.

गुरुवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता चित्पावन फौंडेशन , नवी मुंबई तर्फे प्रास्ताविक करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या, ACP सौ. यशोधरा गोडबोले (Chief Guest) व श्री. जयंत खाडिलकर (Guest of Honour) ह्यांच्या हस्ते "विविधा" ग्राहक पेठेचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. भगवान श्रीपरशुरामांच्या तसबिरीला हार घालण्यात आला. ACP सौ. यशोधरा गोडबोले व श्री. जयंत खाडिलकर ह्यांना संस्थेतर्फे मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. ACP सौ. यशोधरा गोडबोले, श्री. जयंत खाडिलकर तसेच ज्येष्ठ सदस्य डॉ. सौ. रसिका ताम्हनकर, सौ. सानिका व डॉ. श्री. आमोद ताम्हनकर, श्री. कौस्तुभ गोखले, सौ. प्राची व श्री प्रतीक साठे, सौ. माधवी गानू ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व उपस्थितांना पेढे देऊन तोंड गोड करण्यात आले.

ACP श्रीमती. यशोधरा गोडबोले (Chief Guest), ह्या स्टेट इंटेलिजन्स खात्यात कार्यरत असून त्यांना पोलीस खात्यातील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी असणारे अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार मिळाले आहेत. नवी मुंबई क्राईम ब्रँच, वाशी तुर्भे पोलीस स्टेशन स्पेशल ब्रँच, CID अँटी करपशन अशा विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमात देखील त्यांचा सहभाग लक्षणीय राहिलेला आहे.

श्री. जयंत खाडिलकर (Guest of Honour), हे IMC Chamber of Commerce and Industry, Navi Mumbai चे चेअरमन आहेत. तसेच MSME उद्योगांकरिता त्यांनी केलेले कार्य अतिशय मोलाचे असून पॉलिमर क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक अभिनव प्रयोग यशस्वीरीत्या सिद्ध केले आहेत. ते स्वतः एक यशस्वी उद्योजक असून अनेक उद्योग समूहांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला आहे.

मान्यवरांनी अतिशय आत्मीयतेने आणि वेळात वेळ काढून सर्व स्टॉल्स ना भेट दिली तसेच स्टॉल धारकांशी सुसंवाद साधला. स्टॉल धारकांच्या वस्तू व सेवांविषयी जाणून घेतले. त्यामुळे सर्व उद्योजक, व्यावसायिकांचे मनोधैर्य उंचावले.

चारही दिवस "विविधा" ग्राहक पेठेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला; त्यात पनवेल पासून ठाण्यापर्यंत अनेक भागातले लोक आले होते. तसेच मागील वर्षी पेक्षा संख्येतही लक्षणीय वाढ झालेली दिसली. त्यावरून ह्या उपक्रमा बद्दल जनमानसात प्रतिबिंबित होत चाललेली उज्वल प्रतिमा तसेच जाहिराती, डिजिटल माध्यमे तसेच मौखिक प्रसिद्धी माध्यमांद्वारे होत असलेले चांगले परिणाम दृश्य स्वरूपात पाहायला मिळाले.  तर अशा पद्धतीने कोअर कमिटी च्या सर्व मेंबर्सच्या अथक परिश्रमांमुळे व अनेकांच्या प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हातभाराने चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चा हा उपक्रम लक्षणीय दृष्ट्या यशस्वी झाला. अजून एक महत्वाची गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे कि चित्पावन फौंडेशन च्या मुख्य कार्यकारिणीच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनाशिवाय हे शक्य झाले नसते, असे म्हणले तर अवास्तव होणार नाही. 

कुठल्याही स्टॉल वर रुपये ५०० च्या वर खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक वेळी एक "लकी ड्रॉ" कुपन देण्यात येत होते ज्यांची व्यवस्था संस्थेने करून दिली होती. यामागे केवळ स्टॉल धारकांचा व्यवसाय वाढावा ह्यासाठी अशी आकर्षक योजना आखण्यात अली होती. प्रत्येक दिवशी लॉटरी पद्धतीने तीन बक्षिसे जाहीर केली गेली आणि विजेत्यांना ज्या त्या दिवशी देण्यात आली.   

"विविधा" यशस्वी होण्यासाठी कोअर कमिटी च्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहेनत घेतली. सौ. प्राची व श्री  प्रतीक साठे ह्यांनी स्टॉल्स च्या बुकिंग संबंधी सर्व जबाबदारी सांभाळली. तसेच अनेक लोकांशी संवाद साधून शंकांचे समाधानकारक निराकरण करणे, स्टॉल्स चा लेआऊट डिजाईन करणे त्यात जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने स्टॉल्स कसे बसवता येतील ते पाहणे, बुकिंग केलेल्या स्टॉल धारक आणि कोअर कमिटी मधील दुवा म्हणून काम करणे अशी अनेक महत्वाची कामे पार पाडली.
त्याच बरोबर सौ. सायली व श्री. संतोष नेने, सौ.सानिका व श्री. आमोद ताम्हनकर, श्री. कौस्तुभ गोखले, सौ. माधवी व श्री. मिलिंद गानू, श्री. प्रसन्न जोग, श्री अभि गद्रे  ह्यांनी "विविधा"साठी हॉल ची पाहणी, त्यासंबंधित कंत्राटदारांबरोबर चर्चा करणे, स्टॉल उभारण्याच्या दृष्टीने करायची कामे, स्टॉल धारकांना चहा पाण्याची व्यवस्था, परगावहून येणाऱ्या स्टॉल धारकांची राहण्याची व्यवस्था, जाहिरात व्यवस्थापन, कायदेशीर परवानग्या इत्यादी अनेक कामे पार पाडली.
सौ. प्राजक्ता आणि श्री. निशिकांत परांजपे ह्यांनी "विविधा" संबंधित कार्यक्रम पत्रिका, लोगो, बॅनर, प्रिंटिंग मटेरियल, बॅजेस ,कुपन्स इत्यादी अनेक जबाबदाऱ्या उचलल्या. तसेच कोअर कमिटीच्या इतर सभासदांचाही अनेक कामांमध्ये हिरीरीने सहभाग होता; जसे "विविधा" ग्राहक पेठे बद्दल जास्तीतजास्त लोकांपर्यंत माहिती पोचावी ह्यासाठी प्रयत्न करणे, स्टॉल्सची उभारणी, बॅनर लावणे, हॉल चे सुशोभीकरण, पंख्यांची व्यवस्था, तिन्ही दिवस स्टॉल धारकांना पाण्याच्या बाटल्या पुरवणे, चहाची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सिक्युरिटी व्यवस्थापन, गिफ्ट कुपन्स चे व्यवस्थापन इत्यादी. Volunteers चे व्यवस्थापन सौ. केतकी गोखले व सौ. आरती चितळे ह्यांनी पहिले. सर्व स्टॉल धारकांना ह्या वर्षी CFNM कडून मेमेंटो म्हणून नॅपकिन्स चा बुके देण्यात आला. ही अभिनव कल्पना अमलात आणण्याची व्यवस्था श्री. शशांक चितळे ह्यांनी पहिली.

सौ. पूर्णिमा कर्वे, श्री. विश्वास बापट, सौ. प्रीती डोंगरे, श्री. तेजस जोगदंड, सौ. वंदना मुळजकर, सौ. स्नेहा लिमये, श्री. मंदार लिमये, सौ. सायली गोखले, सौ. नीती गद्रे व श्री. शशांक चितळे हे "विविधा" साठी कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते. अशा स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संस्थेकडून कायम स्वागतच आहे.

ह्या वर्षीच्या "विविधा" मध्ये एक अनपेक्षित घटना संकट म्हणून उभे ठाकले होते. ISRO चे चेअरमन श्री. नारायणन हे तामिळ संगम हॉल मध्ये शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता एका कार्यक्रमानिमित्त येणार आहेत, असे हॉलच्या ऑफिस पदाधिकार्यांमार्फत कळवण्यात आले. त्यांच्या सरकारी प्रोटोकॅल्स तसेच सुरक्षिततेच्या नियमांप्रमाणे हॉल दिवसभर बंद ठेवायला लागणार होता. ह्यामुळे आधी ठरल्याप्रमाणे स्टॉल धारकांनी तीन दिवसांचे पैसे भरूनही त्यांचा एक दिवसाचा व्यवसाय तर बंद राहिलाच असता; तसेच ग्राहक पेठ संपली असे वाटून रविवारी ग्राहक स्टॉल्स ना भेट द्यायला आलेच नाहीत तर अशी एक शक्यता पण संकट म्हणून उभी होती. तसेच प्रोटोकॅल्स प्रमाणे त्याहून अधिक एक जिकिरीचे काम करावे लागणार होते. ते म्हणजे तामिळ संगम हॉल मधील स्टॉल्स वरचे सर्व सामान कन्नड संघ हॉल मध्ये नेऊन ठेवावे लागणार होते. 
ह्या सर्व बाबींचा उपद्रव टाळण्यासाठी कोअर कमिटी मधील संतोष नेने, डॉ. आमोद ताम्हनकर, कौस्तुभ गोखले, डॉ. प्रतीक साठे ह्यांनी पोलीस अधिकारी, तामिळ संगम हॉल चे पदाधिकारी तसेच अनेक संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ह्यामधील अडचण सांगितली व अशा पद्धतीने हॉल बंद न ठेवण्याबाबत विनंत्या केल्या. त्याचा योग्य परिणाम म्हणजे तामिळ संगम हॉल विविधा ग्राहक पेठेसाठी अतिरिक्त शुल्क न आकारता गुरुवारी उपलब्ध करून देण्यात आला; तसेच हॉल शनिवारचा पूर्ण दिवस बंद ठेवण्याऐवजी दुपारी १ वाजेपर्यंत "विविधा" साठी उपलब्ध ठेवण्याची परवानगी मिळाली. ह्यामुळे स्टॉल धारकांचा व्यवसाय तर झालाच; त्याचप्रमाणे सामानाची ने-आण  करण्याचे मोठे श्रम टळले.

अशा रीतीने "विविधा" मधल्या सर्व स्टॉल धारकांचा लक्षणीय अशा प्रमाणात व्यवसाय झाला तसेच अनेक नव्या ओळखी झाल्या; ज्याचा उपयोग भविष्यात त्यांच्या उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी नक्कीच होईल.

तसेच सर्व आवश्यक त्या सुविधा योग्य वेळेत आणि विना सायास उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्टॉल धारकांनी चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चे मनापासून आभार मानले. तसेच भविष्यात अशी संधी उपलब्ध करून दिल्यास अवश्य लाभ घेऊ असे आग्रहाने आश्वासनही दिले.

त्याप्रमाणे ग्राहकांनीही एकाच छताखाली अतिशय दर्जेदार गुणवत्ता असलेल्या वस्तू व सेवा रास्त किंमतीत उपलब्ध करून दिल्याबद्दल चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई ला मनापासून धन्यवाद दिले.

© 2025 Chitpavanfoundation.org - All rights reserved.