Vividha Grahak Peth 2026

☜ Back to Programs

"विविधा" ग्राहक पेठ – २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ (वर्ष चौथे)

स्थळ : तामिळ संघम हॉल, वाशी, नवी मुंबई

आयोजक : चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई


आपल्या ज्ञाती मधल्या बंधू भगिनींचा उद्योग व्यवसाय वृद्धिंगत व्हावा; तसेच उद्योजक / व्यावसायिकांची परस्परांशी ओळख वाढावी , व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून चित्पावन फौंडेशन प्रयत्नशील असते.

बरेचदा नव्याने उद्योग व्यवसायात पदार्पण करणाऱ्या बंधू भगिनींना एक व्यासपीठ मिळणे, मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते; त्या दृष्टीने फौंडेशनचा असा प्रयत्न असतो कि अशा उभरत्या उद्योग व्यावसायिकांसाठी जास्तीतजास्त संधी उपलब्ध करून देता येतील.
त्या दृष्टीने चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चे कोअर कमिटी चे सभासद नवनवीन कल्पना लढवत असतात आणि त्यांचा पाठपुरावाही करत असतात.

त्याप्रमाणे चित्पावन फौंडेशन, नवी मुंबईने ह्या वर्षी म्हणजे २०२६ च्या २३ ते २६ ऑक्टोबर रोजी "तामिळ संगम हॉल", वाशी, नवी मुंबई येथे सकाळी १० ते रात्री ९ अशा वेळेत विविधा - ग्राहक पेठेचे आयोजन केले होते. "विविधा" ग्राहक पेठेचे हे सलग चौथे वर्ष होते.

ग्राहकांच्या सोयीकरता तळमजला आणि पहिल्या मजल्यावर स्टॉल उभारण्यात आले होते. मागील वर्षाचा अनुभव पाहता फूड स्टॉल धारकांनी ग्राहकांना व्यवस्थितपणे सेवा देता यावी तसेच ग्राहकांना व्यवस्थित बसून पदार्थांचा आस्वाद घेता यावा म्हणून पहिल्या मजल्यावर खाद्य पदार्थांचे स्टॉल योजले होते.

हॉल बुकिंग पासून ते ग्राहक आणि व्यावसायिक बंधू - भगिनींसाठी स्टॉल सुसज्ज करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, अशा सर्व बाबींची चोख व्यवस्था करण्यात आली होती. “विविधा” टीम च्या कार्यकर्त्यांनी अनेकदा समक्ष भेटून, चर्चा करून समन्वयाने “विविधा” ग्राहक पेठेची उत्तम तऱ्हेने आखणी केली होती. उद्योजक व्यावसायिक बंधू भगिनींचा भरपूर मोठ्या प्रमाणात व्यवसाय व्हावा ह्या दृष्टीने नव्या मुंबईत ठिकठिकाणी तसेच वेगवेगळ्या माध्यमातून वर्तमानपत्र, तसेच अद्ययावत अशा डिजिटल मीडिया, इंस्टाग्राम, व्हाट्स अँप, फेसबुक वगैरे माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली होती. त्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून व्यावसायिक इन्फ्लुएन्सर्स कडून सेवा घेण्यात आली होती. तसेच ह्या वर्षी आपल्याच समूहातील श्री. सुयोग वझे ह्यांनी “विविधा” सुरु होण्याधीपासून स्टॉल ओनर्स चे विडिओ बनवून त्यांना आपापल्या प्रॉडक्ट्स / सेवांबद्दल माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवता येईल ह्यावर अभिनव पद्धतीने काम केले.

त्याचबरोबर वेळोवेळी झालेल्या कमिटीच्या मिटींग्स मध्ये हॉल बुकिंग, जास्तीतजास्त प्रमाणात किती स्टॉल बसवता येतील त्याचा लेआऊट, उद्योग व्यावसायिकांना डोईजड होईल असे भाडे न आकारता परवडेल अशा खर्चात कसे उपलब्ध करून देता येतील, जाहिरात खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्पॉन्सरशिप मिळवणे, जाहिरातीसाठी बॅनर मिळवणे, इत्यादी अनेक गोष्टींचा साकल्याने विचार केला होता.

ह्या वर्षीच्या "विविधा" साठी आपल्या  चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई ला मागील वर्षीप्रमाणेच "वामन हरी पेठे ज्वेलर्स" ह्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध ब्रँड चे युवा पिढीचे प्रतिनिधी श्री. नील पेठे ह्यांनी ‘टायटल स्पॉन्सरशिप म्हणून दोन लाख रुपयांची देणगी दिली.
"वामन हरी पेठे ज्वेलर्स" ची टायटल स्पॉन्सरशिप मिळविण्यासाठी श्री. संतोष नेने, डॉ. सौ. रसिका व श्री. विलास ताम्हनकर ह्यांनी तसेच "पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा लि." ह्या कंपनीची को-स्पॉन्सरशिप मिळविण्यासाठी श्री. कौस्तुभ गोखले यांची मोलाची मदत झाली. "पितांबरी" ह्या नामांकित समूहाकडून रु. पन्नास हजार देणगी स्वरूपात मिळाले.

डॉ. श्री. आशिष फडके ह्यांनी चित्पावन फौंडेशन ला बॅनर रूपाने देणगी दिली. तसेच, श्रीमती अलका थत्ते आणि श्री. अरविंद थत्ते ह्यांनी परदेशातून “विविधा” साठी देणगी दिली. 

ह्या सर्व स्पॉन्सरशिप्स मिळवण्यासाठी तसेच जास्तीतजास्त इच्छुक उद्योजक / व्यवसायिकांपर्यंत  पोहोचण्यासाठी टीम “विविधा” च्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

त्याचप्रमाणे, मागील वर्षी प्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करून असे ठरवण्यात आले कि चित्पावन ब्राह्मण ज्ञाती बरोबरच इतर ब्राह्मण समाजाच्या हिताचा सर्वसमावेशक पद्धतीने विचार करून त्यांनाही "विविधा" ग्राहक पेठेत स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे. त्यामुळे अधिक विशाल दृष्टिकोनातून समस्त ब्राह्मण वर्गाच्या उन्नतीसाठी आपल्या संस्थेला समाजात एक चांगले उदाहरण बनून राहता येईल.

ह्या वर्षी "विविधा" मध्ये ४५ वस्तू / सेवा देणारे स्टॉल्स तसेच ३ खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. काही स्टॉल्स सिंगल टेबल तर काही L स्वरूपात होते. अनेकविध वस्तू , सेवा पुरवणारे उद्योजक, व्यावसायिक ह्यात समाविष्ट होते. जसे कि पुस्तके, पर्सेस, बॅग्स, औद्योगिक भेटवस्तू, पूजा साहित्य, साड्या, दिवाळी फराळ, पीठे, साबण उटणी, रांगोळ्या, दिवे, तेल, क्रोशाची खेळणी, एम्ब्रॉयडरी प्रॉडक्ट्स, बेडशीट्स, कोकण मेवा, आंब्याचे विविध पदार्थ, लोणची, इको टूरीजम, ट्रॅव्हल टूर, कार सर्व्हिसिन्ग, पेन्टिंग्स, ज्वेलरी, गुंतवणूक, इन्शुरन्स, हर्बल प्रॉडक्ट्स, पेन्टिंग्स, आम्रखंड, इत्यादी. तसेच चविष्ट व रुचकर असे अनेक ताजे खाद्य पदार्थ तयार करून देणारे स्टॉल्स ही होते.

शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई तर्फे प्रास्ताविक करण्यात आले. "विविधा" ग्राहक पेठ साठी प्रमुख पाहुणे म्हणून ह्या वर्षी माननीय श्री. रवींद्र माधव साठे उपस्थित होते. श्री. रवींद्र माधव साठे, मुंबई, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा), ह्यांच्या हस्ते “विविधा” ग्राहक पेठेचे फीत सोडून उदघाटन करण्यात आले. भगवान श्रीपरशुरामांच्या तसबिरीला हार घालण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री. रवींद्र माधव साठे ह्यांना संस्थेतर्फे मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. "वामन हरी पेठे ज्वेलर्स" तर्फे रिया मोरे मॅडम व "पितांबरी" कडून आलेल्या श्री. दीपक मेढेकर ह्यांनाही संस्थेतर्फे मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रमुख पाहुणे, माननीय श्री. रवींद्र साठे तसेच चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चे ज्येष्ठ सदस्य श्री. विलास ताम्हनकर, "वामन हरी पेठे ज्वेलर्स" च्या रिया मोरे मॅडम, "पितांबरी" चे श्री. दीपक मेढेकर, टीम “विविधा” चे कौशल्यपूर्ण नेतृत्व केलेल्या आर्किटेक्ट सौ. प्राची साठे, ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व उपस्थितांना पेढे देऊन तोंड गोड करण्यात आले.

ह्या वर्षीच्या "विविधा" चे प्रमुख पाहुणे, श्री. रवींद्र माधव साठे, बोरिवली, मुंबई येथे वास्तव्यास आहेत. ते वाणिज्य पदवीधर असून त्यांचा व्यवस्थापन शास्त्राचा डिप्लोमा झालेला आहे. १९८५ - ९२ असे सात वर्षे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून गोवा आणि मुंबई येथे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे १९९२ ते २०२२ एव्हढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी श्री रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या नामांकित प्रशिक्षण व संशोधन संस्थेत ते कार्यरत होते.
स्वर्गीय सुधीर फडके यांनी स्थापन केलेल्या "सावरकर दर्शन प्रतिष्ठान" या संस्थेचे सचिव म्हणून पण त्यांनी काम पाहिल आहे.

गेल्या सुमारे चार वर्षांपासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती आहेत, हे राज्यमंत्री दर्जाचे पद आहे.

खादी व  मधमाशीपालन विषयासाठी राज्यभर ते प्रवास करत असतात त्याचप्रमाणे मराठी वर्तमानपत्रातून नियमित लेखनही करत असतात. राष्ट्रवाद, नक्षलवाद आणि मधमाशा हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.

तर असे अतिशय व्यासंगी, बहुश्रुत, आणि विविध प्रांतात काम केलेले कर्तुत्ववान व्यक्तिमत्व ह्या वर्षीच्या "विविधा" साठी  प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.

"वामन हरी पेठे ज्वेलर्स" तर्फे आलेल्या रिया मोरे मॅडम व "पितांबरी" तर्फे आलेल्या श्री. दीपक मेढेकर, ह्यांनी आपापल्या ब्रँड व प्रॉडक्ट्स विषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच माननीय प्रमुख पाहुणे श्री. रवींद्र साठे ह्यांनी मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात , व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वृद्धिगंत होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे मोजक्या पण सोप्या पद्धतीने सांगितले. तसेच श्री. साठे साहेब हे खादी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती असल्याने अशा संस्थेमार्फत व्यावसायिकांना कर्ज उपलब्धता, तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देता येईल, असे अनेक उपाय सुचवले.

मान्यवरांनी अतिशय आत्मीयतेने आणि वेळात वेळ काढून सर्व स्टॉल्स ना भेट दिली तसेच स्टॉल धारकांशी सुसंवाद साधला. स्टॉल धारकांच्या वस्तू व सेवांविषयी जाणून घेतले. त्यामुळे सर्व उद्योजक, व्यावसायिकांचे मनोधैर्य उंचावले.

तिन्ही दिवस "विविधा" ग्राहक पेठेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला; त्यात पनवेल पासून ठाण्यापर्यंत, मुंबईतून अनेक ठिकाणांहून लोक आले होते. तसेच मागील वर्षी पेक्षा संख्येतही लक्षणीय वाढ झालेली दिसली. त्यावरून ह्या उपक्रमा बद्दल जनमानसात प्रतिबिंबित होत चाललेली उज्वल प्रतिमा तसेच जाहिराती, डिजिटल माध्यमे तसेच मौखिक प्रसिद्धी माध्यमांद्वारे होत असलेले चांगले परिणाम दृश्य स्वरूपात पाहायला मिळाले.  तर अशा पद्धतीने कोअर कमिटीच्या, विशेषतः टीम "विविधा" च्या सर्व मेंबर्सच्या अथक परिश्रमांमुळे, व अनेकांच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष हातभाराने चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चा हा उपक्रम लक्षणीय दृष्ट्या यशस्वी झाला. अजून एक महत्वाची गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे कि चित्पावन फौंडेशन च्या मुख्य कार्यकारिणीच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनाशिवाय हे शक्य झाले नसते, असे म्हणले तर अवास्तव होणार नाही. 

कुठल्याही स्टॉल वर रुपये ५०० च्या वर खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक वेळी एक "लकी ड्रॉ" कुपन देण्यात येत होते ज्यांची व्यवस्था संस्थेने करून दिली होती. यामागे केवळ स्टॉल धारकांचा व्यवसाय वाढावा ह्यासाठी अशी आकर्षक योजना आखण्यात आली होती. प्रत्येक दिवशी लॉटरी पद्धतीने तीन बक्षिसे जाहीर केली गेली आणि विजेत्यांना ज्या त्या दिवशी बक्षिसे देण्यात आली.

टीम "विविधा" चे नेतृत्व करणाऱ्या सौ. प्राची व श्री. प्रतीक साठे ह्यांनी स्टॉल्स च्या बुकिंग संबंधी सर्व जबाबदारी सांभाळली. तसेच अनेक लोकांशी संवाद साधून शंकांचे समाधानकारक निराकरण करणे, स्टॉल्स चा लेआऊट डिजाईन करणे त्यात जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने स्टॉल्स कसे बसवता येतील ते पाहणे , बुकिंग केलेल्या स्टॉल धारक आणि कोअर कमिटी मधील दुवा म्हणून काम करणे अशी अनेक महत्वाची कामे पार पाडली.
त्याच बरोबर टीम "विविधा" च्या सौ. सायली व श्री. संतोष नेने, सौ.सानिका व डॉ. श्री. आमोद ताम्हनकर, श्री. कौस्तुभ गोखले, सौ. माधवी व श्री. मिलिंद गानू, श्री. प्रसन्न जोग, ह्यांनी “विविधा” साठी हॉल ची पाहणी, त्यासंबंधित कंत्राटदारांबरोबर चर्चा करणे, स्टॉल उभारण्याच्या दृष्टीने करायची कामे, स्टॉल धारकांना चहा पाण्याची व्यवस्था, हॉल मध्ये पंख्यांची व्यवस्था, परगावहून येणाऱ्या स्टॉल धारकांची राहण्याची व्यवस्था, जाहिरात व्यवस्थापन, कायदेशीर परवानग्या, “विविधा” संबंधित कार्यक्रम पत्रिका, लोगो, बॅनर, प्रिंटिंग मटेरियल, बॅजेस, कुपन्स इत्यादी अनेक कामे पार पाडली.

तसेच कोअर कमिटीच्या इतर सभासदांचाही अनेक कामांमध्ये हिरीरीने सहभाग होता; जसे "विविधा" ग्राहक पेठे बद्दल जास्तीतजास्त लोकांपर्यंत माहिती पोचावी ह्यासाठी प्रयत्न करणे, स्टॉल्सची उभारणी, बॅनर लावणे, हॉल चे सुशोभीकरण, तिन्ही दिवस स्टॉल धारकांना पाण्याच्या बाटल्या पुरवणे, चहाची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सिक्युरिटी व्यवस्थापन, गिफ्ट कुपन्स चे व्यवस्थापन इत्यादी. Volunteers चे व्यवस्थापन सौ. आरती चितळे व सौ. प्राची साठे ह्यांनी पाहिले. सर्व स्टॉल धारकांना ह्या वर्षी CFNM कडून मेमेंटो म्हणून पाण्याच्या बॉटल्स (Hot & Cold) देण्यात आल्या होत्या.

सौ. पूर्णिमा कर्वे, सौ. अपर्णा फडके, श्री. डोंगरे, श्री. तेजस जोगदंड, सौ. वंदना मुळजकर, सौ. स्नेहा लिमये, श्री. मंदार लिमये, सौ. सायली गोखले, सौ. नीती गद्रे, सौ. विदुला मोडक, सौ. धनश्री मुदलियार व श्री. शशांक चितळे हे "विविधा" साठी कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते. अशा स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संस्थेकडून कायम स्वागतच आहे.

अशा रीतीने "विविधा" मधल्या सर्व स्टॉल धारकांचा लक्षणीय अशा प्रमाणात व्यवसाय झाला तसेच अनेक नव्या ओळखी झाल्या; ज्याचा उपयोग भविष्यात त्यांच्या उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी नक्कीच होईल.

तसेच सर्व आवश्यक त्या सुविधा योग्य वेळेत आणि विना सायास उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्टॉल धारकांनी चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चे मनापासून आभार मानले. तसेच भविष्यात अशी संधी उपलब्ध करून दिल्यास अवश्य लाभ घेऊ असे आग्रहाने आश्वासनही दिले.

त्याप्रमाणे ग्राहकांनीही एकाच छताखाली अतिशय दर्जेदार गुणवत्ता असलेल्या वस्तू व सेवा रास्त किंमतीत उपलब्ध करून दिल्याबद्दल चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई ला मनापासून धन्यवाद दिले.

 

Chitpavan Foundation. All Rights Reserved.