नारायणी नमोस्तुते
नागपूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये परंपरागत जलसंधारणाचे प्रयोग राबवण्यापासून आज मुंबईच्या वाहतुकीचा चेहरा आमूलाग्र बदल घडविणारी मुंबई मेट्रो! हे आव्हान लिलया पेलणारी आणि या प्रत्येकाला पूर्णत्वाकडे नेणारी, आयएएस अधिकारी, अश्विनी भिडे
सांगली सारख्या निमशहरी गावात मराठी माध्यमात शिकलेली.. दहावी- बारावी गुणवत्ता यादीत आलेली.. मध्यमवर्गीय कुटुंबातून वाढलेली पण सुरुवातीपासूनच वेगळं काहीतरी करायचं होतं त्यामुळे इंजिनिअरिंग, मेडिकलच्या त्यावेळच्या ठरलेल्या वाटांवर न जाता आर्ट्सला अॅडमिशन घेतली. स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनीही विरोध केला नाही. वाचनाची आवड होतीच, त्यामुळे झपाटल्यासारखा अभ्यास केला... लेखी परीक्षा, मुलाखत असे टप्पे पार करत अश्विनी 1995 बॅचमध्ये भारतात महिलांमध्ये पहिली आली.
सुरुवातीच्या काळात इचलकरंजी, सिंधुदुर्ग अशा ठिकाणी काम करत 2000 मध्ये नागपूरला जिल्हा परिषदेमध्ये ची चिफ ऑफिसर म्हणून बदली झाली .तत्पूर्वी 1999 मध्ये आयएएस अधिकारी असणारे डॉ. सतीश भिडे यांच्याशी तिचं लग्न झालं.दोघांची आपापल्या कामांवर पकड होती आणि एकमेकांशी उत्तम संवाद.
नागपूरमध्ये अश्विनीच्या शासकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने एक वळण मिळालं. तिने विकासकामांबरोबरच कमी खर्चात लघु जलसिंचन करणारे बंधारे उभारण्यावर भर दिला.वनराई या संस्थेच्या मदतीने ही काम केली. त्याला चांगलं यश मिळालं. आज या बंधाऱ्यांची नोंद 'अश्विनी बंधारे' अशी झालेली आहे. ही तिच्या कामाची; कामावर असणाऱ्या प्रेमाचीच पोच आहे. या उल्लेखनीय कामाबद्दल तिचं कौतुक तर झालंच पण या मोहिमेकडे सगळ्यांचे लक्ष वेधलं गेलं .जे काम पूर्वी NGO करीत ते शासनाने हाती घेतलं.हा प्रश्न अधोरेखित झाला. धोरणकर्त्यांनी याबाबत काही मूलभूत गोष्टी लक्षात घेतल्या आणि या आधारेच ग्राउंड वॉटर कॉन्झर्वेशन अॅक्टची अंमलबजावणीही झाली.
यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांची उपसचिव म्हणून तिने अतिशय महत्त्वाची कामे केली. विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याचं प्रलंबित काम तिने कमी कालावधीत पूर्ण केलं. प्रसंगी ठाम भूमिका घेतली. तिच्या काही निर्णयांना तत्कालीन राज्यकर्त्यांनी आव्हानही दिलं पण ' न्याय्य भूमिका' हेच कामाचे सूत्र असल्याने तिला पाठिंबा मिळत गेला.
एमएमआरडीएची जबाबदारी आल्यावर मात्र तिच्या समोरचं आव्हान जसं वाढलं तसंच क्षितिजही विस्तारलं... साहित्यामध्ये एमए केलेली अश्विनी आता इंजिनिअरिंगचे धडे समजून घेऊ लागली. रोजच्या वापरातल्या टेक्निकल टर्म समजून घेण्यापासून जटिल इंजिनीअरिंग ड्रॉइंगचा तिने कसून अभ्यास केला .पुस्तकं मदतीला होतीच पण या प्रवासात टेक्निकलची विशेष आवड असणारे तिचे पती डॉ. सतीश भिडे यांचीही खूप मदत होती. याच काळात मुंबईकरांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारे अनेक प्रकल्प पूर्ण झाले. इस्टर्न फ्रीवे, सहारा एलिव्हेटेड रोड हे सर्व तिच्याच कार्यकाळात पूर्ण करण्याचं समाधान तिला मिळालं.
आज एमएमआरसी मध्ये ती मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर आहे. धावणाऱ्या मुंबईचा वेग आणखी वाढवणारा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प.. मुंबई मेट्रो-3! 33.3 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर.. कुलाबा ते आरे कॉलनी धावणारा.. "प्रकल्प जितका मोठा अडचणी तितक्याच आव्हानात्मक. जमीन अधिग्रहण,पर्यावरण खात्याकडून संमती, त्या भागातील रहिवाशांचे स्थलांतर; पुनर्वसन आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांमध्ये ते सगळं बसवणं ..हे सगळंच यानिमित्ताने अनुभवते आहे. रोजचा दिवस नवं काहीतरी घेऊन येतो. खूप काही नवीन शिकायला ही मिळतं आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर उत्तरही मिळतात. जनसंपर्क, संवादातूनच हे शक्य होतं यावर माझा विश्वास आहे. लोकांना चांगले इन्फ्रास्ट्रक्चर हवं असतं पण त्यांसाठी सुरुवातीला होणारा त्रास त्यांना नको असतो. अशावेळी बोलून, प्रश्नांची तीव्रता कमी करता येते. या प्रकल्पाविषयी बोलताना अश्विनीचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत असतो. कितीही अडचणी आल्या तरी त्या सोडवण्यासाठी तिच्या डोक्यात सतत विचारचक्र सुरू आहे ही जाणीव होत राहते. 2021 मध्ये शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वच प्रयत्नांची पराकाष्ठा करताहेत. अश्विनी आणि संबंध एमएमआरसी टीमचं योगदान निश्चितच खूप महत्त्वाचं आहे . हे सगळं करत असताना तिची भूमिका मात्र "मी एक माध्यम आहे ..."एवढीच असते. "शासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना एक समाधान आहे. इथं देशासाठी, भारतीयांसाठी काम केल्याची भावना असते. वयक्तिक पुरस्कारासाठी नाही ...."
अश्विनीच्या कारकिर्दीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आज ती उभी आहे. यापूर्वीच्या तिच्या उल्लेखनीय कार्याची शासन दरबारी नोंद निश्चितच आहे आणि शासनकर्त्यांचा विश्वासही.. ...."आता सोशल मीडियामुळे प्रकल्प आला की त्यावर उलटसुलट चर्चांना ऊत येतो. प्रत्येकजण मत मांडायला उत्सुक असतो .मेट्रो तीन बद्दलही हे होताना पाहिलं.. पण कोणीही प्रत्यक्ष चर्चेसाठी, समजून घेण्यासाठी पुढे येत नाही.. तसं त्यांनी यावं .प्रकल्प आणि शासकीय यंत्रणा लोकाभिमुख झाल्या की अंमलबजावणी सोपी होईल." इति अश्विनी.
गेली पंधरा वर्षे अश्विनीला ओळखतेय.. friend..philosopher..guide.. म्हणून ती बरोबर आहे. एक अभ्यासू, रसिक, अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व! येणाऱ्या प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून बघणारी आणि त्याचा सोनं करणारी.. मराठीतलं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त जगभरातलं साहित्य वाचणारी ..चित्रपट बघून त्याचं उत्तम रसग्रहण करणारी ..तात्कालीन मुद्द्यांपेक्षा दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या गोष्टींवर बोलणं पसंत करणारी; स्वतःचं मत ठामपणे मांडणारी ही मैत्रीण !
मुलांना घडवताना सजग असणारी..सासरी-माहेरी कायम भक्कम आधार म्हणून उभी असणारी..या प्रवासात तिच्या सासूबाई,पती, मुलं-जान्हवी-मल्हार आणि आईचं मोठं योगदान आहे तसंच तिच्या आप्तेष्टांचंही..या व्यापातही तिच्या मित्र-मैत्रिणींसाठी ती नेहमी पूर्वीचीच 'अश्विनी' असते..त्यांच्या आनंदात सहभागी होणारी आणि प्रसंगी मदतीला धावून येणारी..
स्कंददेवता अशीच तर असावी... ती, अष्टभुजा ...ही अष्टावधानी !
काही दिवसांपूर्वी 'कौन बनेगा करोडपती' बघत होते. प्रश्न होता 'भारत में मेट्रोमॅन किसे कहा जाता है?'.... माझ्या डोळ्यासमोर भविष्यातला प्रश्न येत होता...
'भारत में मेट्रो वुमन किसे कहा जाता है ?'
उत्तर असेल ....
"अश्विनी भिडे आयएएस..."