दिवसाला तीन टन बाकरवडी आणि विविध उत्पादनांसाठी रोज चार लाख लिटर्स दूध संकलन, म्हशींना खाणं देण्यापासून दूध काढण्यापर्यंत संपूर्णपणे संगणकावर चालणारा जगातला पहिला सुसज्ज गोठा, भिलवडीतलं म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यासकरणारं जगातलं पहिलं केंद्र, ऑनलाइन ऑर्डर दिल्यास जगाच्या कोनाकोपऱ्यात खाद्यपदार्थ पोहोचवणारं व्यवस्थापन, असा अवाढव्य उद्योग पसरवलेल्या 'चितळे बंधू' यांच्या व्यावसायिक यशाचं रहस्य दडलंय ते त्यांच्या गेली चार पिढय़ा एकत्रित असलेल्या कुटुंबामध्ये. कै.भास्कर गणेश चितळे आणि जानकीबाई चितळे यांनी लावलेल्याया रोपटय़ाचा वटवृक्ष करणाऱ्या, या उद्योगात रमलेल्या चितळे कुटुंबीयांविषयी…
"आमचे चितळे" यातलं कौतुक प्रत्येक मराठी माणसाच्या मनात वसलेलंच आहे आणि ते खरंखरं 'पोटातून' आलेलं आहे. १९३६ च्या सुमारास कृष्णेकाठी भिलवडी गावात सुरू केलेल्या दुधाच्या धंद्याचं रूपांतर आता उद्योगसमूहात झालं आहे. १५० लिटर्स दुधाचा धंदा रोज ४ लाख लिटर्स दूध संकलनावर पोहचलाआहे. भिलवडी परिसराचा कायापालटच केला आहे 'चितळ्यांनी.' कै. भास्कर गणेश चितळे आणि जानकीबाई चितळे यांनी प्रारंभीच्या दिवसात अपार कष्ट उपसले. रात्र रात्र जागून बासुंदी आटवली आहे. मुंबई-पुण्यात गुजराथी व्यापाऱ्यांशी स्पर्धा करून उत्तम चक्का तयार केला आणि 'व्यवसायात यशस्वी व्हायचं तर विपणन व्यवस्थाही आपलीच हवी' हा आग्रहहीत्या काळात धरला आहे, तेव्हा आजचं यश लाभलं आहे.काय असेल याचं रहस्य? कै.भास्कर गणेश ऊर्फ बी.जी.चितळे यांचे थोरले सुपुत्र रघुनाथराव आज ९४ वर्षांचे आहेत. त्यांनी तीन शब्दात उत्तर दिलं. 'कष्ट, सातत्य आणि सचोटी'. माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, "ज्या दिवशी दुधात पाणी घालायची इच्छा होईल त्या दिवशी धंदा बंद करून नोकरी करा." पण तसं व्हायचं नव्हतं. 'चितळे डेअरी', मग 'शिवसंतोष दुग्धालय' नंतर १९५०मध्ये डेक्कन जिमखान्यावर मिठाईचं दुकान आणि नंतर बाजीराव रोडवर दुकान, विस्तार वाढतच होता. पुण्यात रघुनाथराव आणि राजाभाऊ तर भिलवडीला दत्तात्रेय आणि परशुरामभाऊ जोमानं काम करत होते. भास्कररावांच्या दूरदृष्टीने एका मुलाने म्हणजे मुकुंदभाऊंनी पूर्ण ट्रान्सपोर्ट विभाग सांभाळला होता. शिवाय मुकुंद चितळ्यांनी भिलवडीतील 'चितळे डेअरी'च्या अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम केले. पुण्यामध्ये भारती विद्यापीठ, सिंहगड शिक्षण संकुल उभारून बांधकाम व्यवसायातही चितळ्यांच्या नावांची पताका रोवली.
कोणत्याही उद्योगात तांत्रिक प्रगती अपरिहार्यच असते आणि तशी ती केली तरच मोठी झेप घेता येते. 'दूध संकलन आणि वितरणाची जबाबदारी म्हणजे एखाद्या अतिदक्षता विभागातल्या डॉक्टरइतकी कौशल्याची आणि नाजूक आहे. सुरुवातीला दर्जा नियंत्रणासाठी आम्ही खास माणसं नेमायचो. लोकांच्या बरण्यांमधलं दूध तपासून पाहायचो. पुढे पिशव्या आल्या आणि पुष्कळ गोष्टी सोप्या झाल्या.' रघुनाथराव जुने दिवस आठवत सांगतात. पुढे पुढे मुलांनी खूप आधुनिक तंत्रज्ञान आणलं. चितळे कुटुंबात तिसरी आणि चौथी पिढीसुद्धा व्यवसायातच उतरली आहे. अगदी अपवाद म्हणूनही कुणी बाहेर नोकरी करत नाही. ''यात आश्चर्य काही नाही''. बाजीराव रोडचं दुकान सांभाळणारे श्रीकृष्ण चितळे सांगतात, ''लहानपणापासून वडिलांनी त्यांच्यापाठोपाठ दुकानात जायची गोडी लावली. सक्ती केली नाही. पण वेळ वायाही घालवू दिला नाही. निरीक्षण करून करून अनेक गोष्टी शिकता येतात. आमची मुलंही तशीच ओढीनं दुकानात आली.''भिलवडीला तिसरी पिढी म्हणजे विश्वास परशुराम चितळे इंजिनीयर झाले तेव्हा मित्रमंडळी अमेरिकेत येण्याचा आग्रह करत होती. तेव्हा वडिलांनी गोडीनं सांगितलं, ''मी तुला डॉलर्समध्ये तेवढाच पगार देतो. वर्षभर काम कर, नाहीतर खुशाल जा.'' विश्वासनं ते मानलं आणि भिलवडीतच संशोधन विकासात इतके रमले की आज ते उद्योगक्षेत्रातल्या 'डेल पुरस्काराचे मानकरी' आहेत. ''आपले शरुकाका.. त्यांनी इंजिनीयिरगची गोडी लावली आणि वडिलांनी डेअरी टेक्नॉलॉजी केलेलं शिवाय त्यांचा अनुभव समृद्ध ... त्यामुळे या सर्वानी भिलवडीला खूप तांत्रिक प्रगती केली'' विश्वासराव सांगतात.
चितळे डेअरीचा व्याप अनंत, विश्वास, श्रीपाद, गिरीश आणि मकरंद यांनी एकदिलाने पाच पांडवांप्रमाणे वाढविला आणि सांभाळला आहे.कोणत्याही व्यवसायात किंवा कुटुंबातही दोन पिढय़ांमध्ये संघर्ष कधी होतो. एक म्हणजे नवीन तंत्राची ओढ आणि दुसरं पैसा. चितळ्यांकडे संस्थापक भास्कर गणेश यांनीच नेहमी काळाच्या पुढे पाऊल टाकलं. त्या काळात सुसज्ज पाश्चरायझेशनची सुरुवात त्यांनी केली. वैयक्तिक पातळीवर पिशव्यांतून दूध देण्याचा प्रारंभ केला. चक्का-खवा यासाठी मशिनरी आली.भारतात पहिल्यांदा १९८८-८९ मध्ये चितळ्यांच्या दुकानात आरएफआय बिलिंग सिस्टीम आली. म्हशींना खाणं देण्यापासून दूध काढण्यापर्यंत संपूर्णपणे संगणकावर चालणारा सुसज्ज गोठा जगात पहिल्यांदा चितळ्यांनी भिलवडीत उभारला. आणि आता म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारं जगातलं पहिलं केंद्र भिलवडीतच आहे, ज्याचा फायदा परिसरातले शेतकरी घेतच आहेत. पण कोणताही शेतकरी त्यांच्याकडून अशा तऱ्हेचं मार्गदर्शन घेऊ शकेल. इकडे पुण्यात ७०-७१च्या सुमाराला राजाभाऊ चितळयांनी नागपूरची पुडाची वडी आणली. गुजराती बाकरवडीला मागे सारत खास मराठी चवीची बाकरवडी आणली आणि या बाकरवडीनं चितळ्यांना जगभर पोचवलं. दुकानासमोर रांगा लागायच्या. ५० माणसं ठेवली कामाला तरी दिवसाला ५०० किलोपेक्षा जास्त बाकरवडी बनत नव्हती. राजाभाऊ, श्रीभाऊ आणि माधव चितळे यांनी परदेशात जाऊन सतत प्रयोग करून आपल्याला हवं तसं बाकरवडीचं मशीन बनवून घेतलं. आता दिवसाला ३ टन बाकरवडी बनवता येते आणि कंटेनर्स भरभरून परदेशातही जाते. चितळेंनी कधी पासष्टाव्या कलेला म्हणजे जाहिरातीला आपलं मानलं नाही. डेक्कन जिमखान्यावरचे संजय म्हणतात, ''कशाला हवी जाहिरात? दर्जा आणि चव या दोन्ही गोष्टी करतातच की जाहिरात.'' एकदा सह्य़ाद्री वाहिनीनं चितळ्यांवर एक लघुपट केला. तो प्रसारित झाल्यावर प्रतिक्रिया आल्या ''हं, हल्ली मशीनवर बनवतात बाकरवडी, तरीच पूर्वीची मजा नाही राहिली.'' गंमत म्हणजे तोवर बाकरवडीचं मशीन येऊन १० वर्षे झाली होती. बाकरवडीचं उत्पादन आणि खप कित्येक पटीनं वाढला होता.'' एकाच व्यवसायात कायम टिकायचं असेल तर घरं वेगवेगळी ठेवा'' हाही मूलमंत्र बी.जी.चितळे यांचाच. त्यामुळे सुरुवातीपासूनच ज्याला हवा त्याला स्वतंत्र संसार मिळाला. आता तर डेअरी, मिठाई, एग्रो, फूडस् आणि चितळे डिजिटल्स.. सारे स्वतंत्र उद्योग आहेत. मिठाईवाले जसे इतरांकडून कच्चा माल घेतात तसाच भिलवडीहून खवा घेतात. पैशाचा हिशेब चोख. सर्व घरांना ठरलेली रक्कम मिळाली की नफा पुन्हा व्यवसायवृद्धीसाठी वापरतात. बाहेरच्या माणसांना तर नाहीच, पण बाहेरच्या पैशांनाही चितळ्यांकडे प्रवेश नाही.
व्यावसायिक आघाडीवर चितळ्यांच्या घरातील स्त्रिया कधी फारशा दिसल्या नाहीत. पण प्रारंभी जानकीबाईंनी दूध मोजून घेण्यापासून चक्का बांधायची कापडं साफ करण्यापर्यंत कित्येक कामं सांभाळली. भिलवडीत पद्मजा परशुराम यांनी दुधाचे हिशेब, दर तासानं निघणारे टेंपो, चक्का, खवा यांवर तर नजर ठेवलीच, पण आज त्या चितळे एग्रोच्या फळबागेत सकाळ-संध्याकाळ एक फेरी मारतात. अन् कसलंही उणं त्यांच्या नजरेतून सुटत नाही असं म्हणतात. पुण्याला मंगलाताई, विजयाताई आणि सुनीताताई यांनी पूर्ण दर्जा नियंत्रण कित्येक वर्षे सांभाळलं. सकाळ-संध्याकाळ कारखान्यात फेरी, तळणावर लक्ष, वडय़ांमधली साखर, श्रीखंडातलं केशराचं प्रमाण यावर रोजच लक्ष ठेवावं लागलं.आज तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतल्या सुना उच्चशिक्षित आहेत. गरजेप्रमाणे लक्ष देतात. पण रोजची जबाबदारी कुणी घेतलेली नाही. विश्वास चितळेंचं उत्तर असं की, ''त्यांनी घर आणि माणसं सांभाळली म्हणून आम्ही सर्व भाऊ-काका एकत्र टिकून राहिलो. आमच्या आजी-आई-काकूमुळे चितळ्यांच्या पदार्थाच्या चवीचं स्टँडर्डायझेशन झालं हे मोठं योगदान आहे. ''व्यवसाय करता करता संस्कृती निर्माण करणं, टिकवणं आणि वाढवणं हे उत्तम उद्योगाचं लक्षण आहे. भिलवडी परिसरातल्या शेतकऱ्यांना हजारो म्हशी देऊन, देखभाल करून, दूध विकत घेणारे चितळे तेथील शेतकरी स्त्रियांसाठी अनेक आरोग्य प्रकल्प राबवतात. त्यांना आधुनिक माहिती पुरवतात. एक हजार जोडप्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनी विविध कामांमध्ये गुंतवलं आहे. शास्त्रीय पद्धतीनं जेनेटिक्सद्वारा गुणवृद्धी करून येत्या काही वर्षांत दहा लाख उत्तम वासरं जन्माला घालण्याचे प्रयोगचालू आहेत. त्यातून दुधाचं उत्पादन प्रचंड वाढेल. शेतीतही नवनवे प्रयोग चालू आहेत. रेडीमिक्सची सकस पाकिटं ते बनवताहेत. दुधापासून दुधाच्या महापुरापर्यंत आणि सकस शुद्ध चवीपासून गृहलक्ष्मीच्या आरोग्यापर्यंत चितळे कुटुंबीयांचं काम पोहचत आहे.
धन्यवाद हा लेख वाचल्या बद्दल 🙏🙏 मराठी माणसाचे कर्तुत्व पुढे पाठवा अभिमान वाटला तर.