गेल्या काही वर्षांपासुन होत असलेला यु.ए.ई. चित्तपावन संमेलनाचा कार्यक्रम, या वर्षी सालाबाद प्रमाणे शुक्रवार १० एप्रिल २०१५ या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत, इंडिया क्लब दुबईचे वास्तुत, आनंदाने आणि विचारांचे आदान – प्रदान करंत खेळी – मेळीत पार पडला.
दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर दुबईतील सौ. सोनाली भट यांनी यु.ए.ई. चित्तपावन समाजाच्यावतीने राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांबद्दलची माहिती दिली. तसेच यापुढे देखील असे विविध उपक्रम यु.ए.ई. चित्तपावन समाजाच्यावतीने सुरूच राहतील असे उदगार काढुन त्यांनी रजा घेतली.
श्री. संतोश मराठे – सि.एफ़.ओ. अमेरिकन हॉस्पिटल दुबई, यांनी व्यवस्थापन "मॅनेजमेंट", व्यवस्थापन शास्त्राची "मॅनेजमेंटस्किल्सची" माहिती तसेच त्यात येणा-या अडचणी "प्रॉब्लेम्स" आणि त्यांच निराकरण करण्याची प्रक्रिया याची माहिती थोडक्यात पण व्यवस्थीतपणे उपस्थितांसमोर मांडली.
भारतातुन खास यु.ए.ई. चित्तपावन संमेलनाचे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व, श्री. दिपक घैसास यांनी आपल्या चित्तपावनी शैलीत छान कोपरखळ्या देत आजचे आपले हरघडीचे साथिदार आणि साक्षिदार म्हणजे भ्रमणध्वनी "मोबाईल फ़ोन" तसेच संगणक "कॉंप्युटर" यावरील आपले विचार व्यवस्थित पटतील अशा भाषेत मांडले. त्यांचा वैविध्यपुर्ण व्यासंग खरंच मनाला उभारी देणारा आणि प्रेरणादाई असाच आहे याचा साक्षात्कार उपस्थितांना झाल्यावाचून राहिला नाही.
यानंतर डॉक्टर रेवा नातु (संगीत पि.एच.डी.) आणि त्यांच्या सहका-य़ांनी संगीतातील एका अविस्मरणीय अनुभवाचा आस्वाद सर्व उपस्थितांना दिला.
कार्यक्रमाचं सुत्रसंचालन, आपल्या हलक्या फ़ुलक्या विनोदी पण मिश्कील शैलीत श्री. मिलींद विनोद यांनी फ़ार खुमासदार पध्दतीने केलं. कार्यक्रमाची सांगता दुपारचे साग्रसंगीत भोजनाने आनंदात झाली.