प्रास्ताविकलेखक : डॉ. अ.व्यं.सावजी, नागपूर.लोकमान्य टिळक, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे अशी अनेक नररत्ने चित्पावन ब्राह्मण समाजाने आधुनिक भारताला दिलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची ध्वजा सिंधूनदीपर्यंत पोहोचविण्याच्या पराक्रमात चित्पावनांचे योगदान बरेच मोठे आहे. बाजीराव बाळाजी आणि चिमाजी अप्पा ह्यांच्या पराक्रमास इतिहासात तोड नाही. पेशवाई हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक गौरवशाली कालखंड आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. आज अनेक चित्पावन अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने तळपत आहेत. ''पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाळ'' ह्या नियमाच्या समग्र अर्थानुसार ह्या कर्तृत्वपूर्ण समाजाचा पूर्वेइतिहास हा भव्य-दिव्य असलाच पाहिजे हे उघड आहे.तथापी चित्पावन ब्राह्मणांबद्दल काही आधाररहित अपसमज आहेत. हे अपसमज काही प्रमाणात ह्या शाखासमाजाबद्दल असणार्या असूयेपोटीही असू शकतील, तथापी ते मुख्यत: चित्पावनांच्या इतिहासामधील काही गळलेल्या दुव्यांमुळे (मिसिंग लिंक्समुळे) आहेत. रामायणपूर्व काळापासून ते शिलाहार-यादव संघर्षकाळापर्यंत (इ.स.1265 पर्यंत) चित्पावनांची वस्ती सोपारा परिसरापुरतीच सीमित होती. शिलाहार सत्ता कोलमडल्यानंतर चित्पावन समुद्रमार्गे दाभोळ खाडीतून प्रवेश करून चिपळूण भागात स्थलांतरित व स्थायिक झाले. चित्त + तप + वन = चित्पावन''चित्त'', ''तप'' व ''वन'' ह्या तीन शब्दांच्या संयुक्तीकरणामुळे चित्पावन हा शब्द निर्माण झालेला आहे. नुसते शारीरिक क्लेश म्हणजे तप नाही. तपासाठी चित्त प्रसन्न असणे आवश्यक आहे. तपामध्ये शरीरापेक्षा मनाचं, चित्ताचं महत्त्व कितीतरी पटीने जास्त आहे. ''नाही शुद्ध चित्तवृत्ती ! नाही कैवल्याची प्राप्ती !! (2/4/18) असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. पूर्ण मौन न पाळता अधूनमधून आध्यात्मिक चित्तानंदासाठी सुगम सामगान करणार्या तपस्यांना चित्ततप - चित्तप ही संज्ञा आहे. सामवेदीय ब्राह्मणास गृहीतसहस्र ब्राह्मण, चित्ततप ब्राह्मण, सामक ब्राह्मण चित्तप ब्राह्मण अशा विविध पर्यायी संज्ञा आहेत. सामवेदीय ब्राह्मणांना 'चित्तप ब्राह्मण' म्हणतात. हे डॉ.मधुकररावांसारख्या वेदविषयातील अधिकारी विद्वानांनी सुस्पष्ट केले आहे. '' ह्या कर्मप्रवणतेसाठी गाणे मोलाचे - त्याचे गायनही हवे तोलाचे. म्हणूनच ओंकार हा उद्गीथ म्हटला आहे. कामनापूर्तीसाठी सगळ्या ऋषींनी नैमिषारण्यात उद्गीथाची उपासना केली.... (गायन, पूजन आणि स्तवन करावे - ओंकाराचे उपनिषदांचा अभ्यास : नवे संदर्भ. डॉ.मधुकर आष्टीकर पृ.84).श्रीमद्भगवत् गीता आणि ''चित्त - तप''गीतेच्या सहाव्या अध्यायात चित्त आणि तप ह्यांचा संबंध फार सुंदर रीतीने सुस्पष्ट केला आहे. मुनी, तपस्वी आणि योगी ह्या तिन्ही संज्ञा वेगवेगळ्या आहेत. सामान्यत: जो मौन पाळतो, तो मौनी मुनी - असा समजला जातो. साधनेचा एक भाग म्हणजे जो स्वत:हून स्वत:ला शिस्तबद्ध रीतीने शारीरिक क्लेश करून घेतो तो तपस्वी आणि चित्ताचं, मनाचं महत्त्व जाणून जो तपाला चित्ताच्या प्रसन्नतेची जोड देतो, तो योगी. त्यामुळे ''योगी'' आणि ''चित्ततप'' ह्या समानअर्थी संज्ञा आहेत. (योगी.... एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रह : 6/10) गीतेनुसार मुनीपेक्षा योगी श्रेष्ठ आहे आणि तपस्वीपेक्षासुद्धा योगी श्रेष्ठ आहे (योगयुक्तो मुनिर्बह्य न चिरेणाधिगच्छती 5/6 आणि तपस्विभ्यो ऽ धिको योगी ज्ञानिभ्यापि मतो ऽ धिक : 6/46) योगी (म्हणजे चित्ततप) ही सर्वोच्च संज्ञा आहे. गीतेच्या दहाव्या अध्यायाच्या क्रमांक बाविसाव्या श्लोकामध्ये ''सामवेद'' आणि ''मन(चित्त)'' ह्यांच्या सर्वोच्च श्रेष्ठत्वाचे ''समीप'' उल्लेख आले आहेत. ''वेदानां सामवेदोस्मि.... इंद्रियाणां मनश्चास्मि'' मन(चित्त) हे सर्व इंद्रियांमध्ये श्रेष्ठ आहे स्पष्ट म्हटले आहे. सामगानाने चित्ताची प्रसन्नता हमखास मिळते. त्यामुळे ही समीपत असे सार्थ आहे. चित्ततप ही संज्ञा प्रत्यक्ष श्रीमद्भगवद्गीतेतील ''यतचित्तात्मा'' प्रभावातून निर्माण झालेली आहे.नालंदा अधतन कोशामधील ''तप'' ह्या शब्दाच्या अर्थव्याखेवरूनसुद्धा तप आणि चित्त ह्यांचा अपेक्षित सुसंबंध लक्षात येईल. ''तप :- शरीर को कष्ट देनेवाले व धार्मिक व्रत और नियम आदि कृत्य जो चित्त को भोग विलास से हटाने के लिये किये जाये.'' तात्पर्य, तप हे श्रेष्ठ आहे; पण चित्ताच्या प्रसन्नतेशिवाय त्यास पूर्णत्व येत नाही. चित्तप म्हणजे आदर्श तपस्वी - ''कर्मनिष्ठ वंद्यु । तो ज्ञानियांसी वेद्यु।। तापसांचा आद्यु ।। तपोनाथु ।।'' सोपार्याहून समुद्रमार्गे दाभोळच्या खाडीतून प्रवेश करणारे आजच्या चित्तपावनांचे पूर्वज चित्तप होत, दाभोळ खाडीतून प्रवेश केल्यावर त्यांचे पुनर्वसनकेंद्र वसिष्ठी नदीच्या उत्तरकाठावरील परशुराम मंदिराच्या सभोवतालच्या वनामध्ये वसविण्यात आले. त्यांच्या वास्तव्यामुळे ह्या वनाला चित्तपवन ही संज्ञा प्राप्त झाली. ह्या चित्तपवनामधून दक्षिणकोकणांत विखुरलेल्या लोकांना चित्तपावनातून आलेले म्हणून चित्तपवन ही संज्ञा दक्षिण कोकणात निर्माण झाली. चित्तपावन हा शब्द चित्ततपवन असा लिहिणे जास्त योग्य आहे. तप :चित्पावन ह्या शब्दाच्या जडणघडणीमध्ये ''तप'' हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ह्या संदर्भात तप ह्या शब्दाचे महत्त्व जितके वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. ''आम्हां घरी धन शब्दांचींच रत्ने । शब्दांचींच शस्रे यत्न करूं ।। शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्द वांटू धन जनलाकां ।। तुकाम्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्देंची गौरव पूजा करू ।। (अभंग 1627) तप हा शब्द चित्पावन संज्ञेचे शब्दधन आहे - चित्पावनांचे संचित आहे.वन :वन ह्या शब्दाचा वापर आपणास पुष्कळच परिचयाचा आहे. रामदास स्वामी महाराष्ट्राला आनंदवनभुवन म्हणत. ''गोव्यातील चंद्रमंडळ किंवा चंद्रवाडीच्या सीमेवर रिवण नावाचा एक गाव आहे. ऋषीवन ह्या संस्कृत शब्दापासून रिवण हा शब्द बनला आहे.'' (-श्री गौडपादाचार्य संस्थान कैवल्यपूर समग्र इतिहास, ल. गायतोंडे इ.स.1979. पृष्ठ 50) वृन्दावन, सुन्दरवन, गोंडवन असे अनेक प्रसिद्ध परिसर आहेत. नंतरच्या काळातसुद्धा नृपतींनी व सद्गृहस्थांनी तपस्यांकरिता वने निर्माण करावी व त्यांची मने प्रसन्न ठेवावीत असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. ''लावी वने उपवने । पुष्पवाटिका जीवने । निववी (निववी = प्रसन्न ठेवणे) तपस्व्यांची (तापसांची मने। तो सत्त्व गुण ।।'' (दशक 2, समास 7, श्लोक 21 दासबोध.) ह्या श्लोकामध्ये वन, तपस्वी आणि चित्त ह्यांचा अतूट संबंध प्रकट झाला आहे. पुष्प, संगीत आदी गोष्टींनी, तपस्यांनी तप करताना आपले चित्त प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे हे पण त्या श्लोकांवरून लक्षात येते. ''विरक्ते लावावे भजन । विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान । प्रगटवावे (2/9/8) अथवा करणे सुगम। भजन भगवंताचे ।।'' (2/4/6) असेही रामदासांनी म्हटले आहे आणि तपस्येमधील व चित्ततपमधील संगीताच्या व सामगानाच्या महत्त्वाचा अस्पष्ट - स्पष्ट निर्देश केला आहे असे म्हणतात.''चित्ततपवन'' आणि ''चिपळूण'' ह्या शब्दांची संबंधमीमांसाचित्ततपवन परिसर आणि चिपळूण गावाचा परिसर हे अगदी खेटून आहेत. ह्या दोन्ही परिसरांमध्ये फक्त वसिष्ठी नदी आहे. अगदी खेटून असले तरी हे दोन परिसर भिन्न होते व आहेत. आजही ह्या दोन परिसरांत 8 ते 9 किलोमीटर एवढे अंतर आहे. चित्तप ब्राह्मणांची आद्य पुनर्वसन छावणी परशुराम मंदिरासभोवताली वसिष्ठी नदीच्या उत्तरकाठावर होती.चित्तपवन ह्या शब्दावरून चिपळूण शब्द आला नाही. चिपळूण ह्या शब्दावरून चित्तपवन हा शब्द आला नाही हे मनावर नीट बिंबविणे आवश्यक आहे. चित्तपवन हे चिपळूण नगराचे एक स्वतंत्र उपनगर आहे हे लक्षात ठेवले, म्हणजे कोणत्याही वैचारिक गोंधळाला जागा राहात नाही. चिपळूण हे चित्तपावनांचे दक्षिण कोकणातील मूळ गाव आहे. हे स्थूलमानाने बरोबरच आहे चुकीचे नाही. तरीपण शुद्ध काटेकोरपणे विचार करताना चित्पावनांचे दक्षिण कोकणातील मूळ गाव चिपळूण गावाला खेटून, पण तरीही वेगळे असणारे परशुराम मंदिराभोवतीचे चित्ततपवन परिसर हे आहे. खुद्द चिपळूण नाही. त्यामुळेच चित्तपावनांना ''चिपळुणे ब्राह्मण'' असे म्हणत असले, तरी देवरुखे ब्राह्मण किंवा कर्हाडे ब्राह्मण ह्या संज्ञा जितक्या लोकप्रिय झाल्या तितकी ''चिपळुणे ब्राह्मण'' ही संज्ञा लोकप्रिय होऊ शकली नाही. चिपळूण शहर इ.स.1265 सालीसुद्धा एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मोठे केंद्र व व्यापारपेठ होती. त्यामुळे ह्या शहराच्या अंतर्गत सुमारे दहा हजार लोकसंख्या - वस्ती एकदम सामावून घेणे सहज शक्य नव्हते. त्यामुळे त्याची व्यवस्था वसिष्ठी नदीच्या उत्तरकाठावर करण्यात आली. चित्पावन ब्राह्मणांची दक्षिण कोकणातील आद्य-वसाहत चिपळूण गाव परिसरातील परशुराम मंदिराच्या सभोवार होती. गुहागर येथे पुढे काही वर्षांनी काही चित्पावन कुटुंबे गेली, तरी गुहागर येथे चित्पावनांची आद्य पुनर्वसन छावणी मुळीच नव्हती. चाचे व परचक्र ह्यांच्या भीतीमुळे प्रत्यक्ष समुद्रकिनार्यावर असणार्या गुहागर ह्या गावी स्थलांतरित व अजूनही भांबावलेल्या मन:स्थितीतील लोक वस्ती करतील हे असंभव आहे. गुहागर हे चित्पावनांचे मूळ गाव नसले तरी त्यांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. वाडेश्वर महाकाव्य''चित्तपावन'' ह्या शब्दाच्या संदर्भात सर्वांत उपलब्ध प्राचीन आणि प्राचीन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण सुस्पष्ट पुरावा म्हणजे वाडेश्वर महाकाव्य. चित्तपवन ह्या शब्दाचा सर्वांत प्राचीन उल्लेख ह्या जुन्या संस्कृत काव्यात आढळतो. हे काव्य, कौशिकगोत्री विश्वनाथ नामक द्विजाने सवंत 1550 मध्ये (सन 1628-29मध्ये) रचले होते... ह्या काव्याच्या अकराव्या सर्गात चिपळूण गावाजवळच्या लेण्यातील कार्तिकेय व विंध्यवार्सिनी ह्या देवतांचा उल्लेख आहे. अथ वाडेश्वरात्प्राच्यां दिशि योजनपंचके। उपशल्ये श्वभ्रगहे बहिश्चित्तपपत्तनात्.............या श्लोकात गुहागर येथील वाडेश्वर देवालयाला पूर्वेला पाच योजनांच्यावर चित्तपनगराबाहेरील लेण्यातील (श्वभ्रगृहे) कार्तिकेय आणि विंध्यवासिनी यांच्या प्रतिमांचा उल्लेख आहे. त्याचे शिलाहारकालीन नाव चिपुलण होते; पण ते विश्वनाथ कवीला माहीत नव्हते. त्याच्या काळी चिपळूण हे चित्तपांचे (चित्पावन ब्राह्मणांचे) मूलस्थान मानले जात असल्याने त्याने त्या नगराचे चित्तप असे नाव कल्पिले आहे. चित्तप किंवा चिपळूण हे गुहागरच्या पूर्वेस सुमारे पाच योजनांवर आहे.... तेव्हा हे उल्लेख त्याचेच आहेत यात संशय नाही'', (शिलाहार राजवंशाचा इतिहास व कोरीव लेख, डॉ.वा.वि.मिराशी. पृष्ठ 144 - 145.) ह्या विश्वनाथ कवीला गुहागर व चित्तपवन (चिपळूण) परिसराचीसुध्दा प्रत्यक्ष माहिती होती. (तो स्वत: जन्माने चित्तपावन ब्राह्मण असण्याचीसुद्धा बरीच जास्त शक्यता आहे). कार्तिकेय व विंध्यंवासिनी मंदिर चिपळूण तालुक्यात रावतळे येथे आहे. रावतळे ते चिपळूण शहर हे अंतर तीन - चार किलोमीटर आहे. रावतळे येथे परशुराम मंदिर (चित्तपनगर) अंदाजे आठ - नऊ किलोमीटर आहे. असे असतानासुध्दा ह्या विश्वनाथ कवीने इ.स.1628 मध्ये ह्या विंध्यस्वामिनी लेण्याचा उल्लेख चिपळूण शहराजवळ असा न करिता चित्तप नगरजवळ (परशुराम मंदिराजवळ) असा का केला? ह्याचे उत्तर असे की, 'चित्तपवनांमधून विखुरण्यांच्या क्रियेमध्ये गुहागर गावात चित्पावनांची बरीच वस्ती झाली होती. त्यांच्यातील काही लोकांनी ह्या वाडेश्वर मंदिराची स्थापना केली. ह्या मंदिराचे माहात्म्य समस्त चित्पावन व इतर भक्तगणांना कळवावे हा विश्वनाथ कवीचा उद्देश होता. त्याकाळी चित्तपवन आणि चिपळूण ही एकमेकांना खेटून असलेली पण वेगवेगळी उपनगरे मानली जात होती. त्यामुळे चित्तपवनाचा उल्लेख करताना ह्या विश्वनाथ कवीला चिपळूणचा उल्लेख करण्याचे प्रयोजन वाटले नसावे. वाडेश्वर मंदिराचे भक्त प्रामुख्याने चित्तपावन ब्राह्मण असल्याने त्यांना चित्तपनगर हे चिपळूणपेक्षासुध्दा भावनात्मक दृष्टिने अधिक जवळचे व ओळखीचे वाटत असल्याने संदर्भासाठी अधिक सोयीचे व सुलभ होते. आजही अधिकांश प्रवासी गाइडमध्ये गणपती पुळे हे रत्नागिरीपासून 45 कि.मी. आहे. ह्यापेक्षा मुंबईहून 378 कि.मी. व पुणे शहरापासून 348 कि.मी. आहे, असे उल्लेख आढळतात. ह्या महाकाव्यावरून चित्तपावन हे इ.स.1628 ते 29 सुमारास दक्षिण कोकणात चांगले स्थिरावले होते आणि दाभोळच्या खाडीतून सर्वांना प्रवेश केल्यानंतरचे त्यांचे मूळगाव चित्तपावन होते, हे दक्षिण कोकणात माहीत झाले होते. चित्तपवनातून विखुरण्याच्या प्रक्रियेमध्ये चित्तपवनात फारच थोडी घरे उरल्याने 1650-60 नंतर चिपळूण शहर हेच चित्तपावनांचे मूळ गाव मानण्यात आले. ते स्थूलमानाने बरोबरच आहे. इतिहास क्लिष्ट न करण्याच्या दृष्टीने सुलभतेचे आहे. त्या दृष्टीने सर्वमान्य होऊ शकणारे आहे. चित्ततप ब्राह्मणाच्या इतिहासाच्या संदर्भात ''साक्षी भगवान'' ठरलेले हे वाडेश्वर माहात्म्यामध्ये उल्लेख आलेले महत्त्वपूर्ण देवस्थान रावतळे ह्या चिपळूण तालुक्यातील गावामध्ये मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. इ.स.1983 साली महापुरात ह्या देवळाच्या मागील बाजूचे डोंगराचा भाग कोसळून सर्व मंदिरच गाडले गेले. त्यामुळे ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची योजना आवश्यक झाली. 1 फेब्रुवारी 1988 रोजी जुन्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा शानदार समारंभ झाला. जुन्या मंदिराचे व मूर्तीचे फोटो पुढे अभ्यासकांना उपयोगी पडावे म्हणून जतन करून ठेवण्यात आले आहेत. संपूर्ण परिसराचे सौदर्यीकरणाचे काम जोरात चालू आहे. श्री.अण्णाशेठ चितळे, चिपळूण, पिनकोड - 415 605. हे ह्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ह्या प्रकल्पासाठी ते जिवापाड मेहनत घेत आहेत. ''कोकणस्थ'' या शब्दाचा उदय व उपयोगशिथिलता:चित्तप ब्राह्मण दाभोळ खाडीतील आगमनापासून ते बाळाजी विश्वनाथ पेशवे होईपर्यंत (म्हणजे इ.स.1265 ते इ.स.1713 पर्यंत) ''कोकणस्थ'' शब्द निर्माण झाला नव्हता. इ.स.1265 ते 1713 ह्या पाचशे वर्षाच्या कालखंडात चित्तपवन ब्राह्मण दक्षिण कोकणाच्या बाहेर अजिबात फिरकले नाहीत. दक्षिण कोकणाच्या परिसीमेच्या आतच चिपळूणजवळील त्यांच्या निर्वासित छावणीतून पसरले व विखुरले. बहुसंख्य चित्पावनांनी वेदविद्या, अध्ययन व अध्यापनाची वृत्ती अबाधित ठेवून शेती करण्यास सुरुवात केली. प्रत्येक कुटुंबाला शेतीयोग्य पुरेशी जमीन मिळण्यासाठी विखुरले जाणे क्रमप्राप्तच होते. ह्या विखुरण्याच्या क्रियेत चित्ततपवन ब्राह्मण कोकणात जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी आम्ही चित्तपवनाहून आलो आहोत असे सांगितले. त्यामुळे चित्ततपवन चित्पावन हा शब्द चांगलाच रूढ झाला. ह्या चारशे वर्षांत चित्पावनांची वस्ती दक्षिण कोकणापुरतीच सीमित असल्याने कोकणस्थ ब्राह्मण हा शब्द निर्माण होण्याचे कोणतेच औचित्य नव्हते, प्रयोजन नव्हते. कारण कोकणातील सर्वच अठरापगड जाती-जमाती भौगोलिक अर्थाने कोकणस्थच होत्या. चित्पावनांच्यापेक्षाही अधिक प्राचीन कोकणस्थ होत्या.बाळाजी विश्वनाथ हे 20 नोव्हेंबर 1713 रोजी पेशवे झाले. बाळाजी विश्वनाथानंतर ''कोकणस्थ ब्राह्मण'' हा शब्द अवतरला व तो इतका लोकप्रिय झाला, की देशस्थ ब्राह्मणांना, '' देशस्थ'' हा सापेक्ष शब्द निर्माण करून तो अंगिकारणे भाग पडले. पेशवाईमध्ये कोकणातून देशावर स्थलांतरित इतर जाती-जमाती कोकणस्थ ह विशेषण लावण्यास धजत नसत. त्यामुळे ''कोकणस्थ'' हा एवढा शब्द म्हटला तरी त्यापासून कोकणस्थ ब्राह्मण एवढा पूर्ण अर्थबोध होत असे. इ.स.1930 नंतर कोकणांत असणार्या बर्याच जाती-जमाती कोकणस्थ हे विशेषण लावू लागल्या. कोकणस्थ मराठा, कोकणस्थ मुसलमान, असे शब्दप्रयोग पुढे येऊ लागले. विवाहविषयक विज्ञापनात दिसू लागले. ह्या नवीन बदलामुळे चित्पावनांना त्याच्या कोकणस्थ ह्या कांहीशा संदिग्ध संज्ञेपेक्षा चित्पावन ही असंदिग्ध निश्चित संज्ञा परत आवडू लागली. त्यामुळे सध्या कार्यरत असणारी कोकणस्थ ब्राह्मणांची समाजसेवा संघटना मंडळे ''चित्पावन संघ'' असे फलक लावत आहेत. पुणे शहरामध्ये, (पेशव्यांच्या ऐतिहासिक राजधानीमध्ये) ह्या संघटनांचा प्रभाव स्वाभाविकपणेच अधिक आहे. चित्पावनांच्या इतिहासगंगेची सोपारा ही गंगोत्री आहे, तर चिपळूण हे हरिद्वार आणि पुणे हे काशी आहे, हे ह्या संस्थांच्या कार्य-भरारीमुळे पटते. |
‘‘चित्त’’ आणि ‘‘पावन’’ ह्या शब्दांचे अनुचित आणि उचित अर्थ‘‘चित्त - तप - वन ह्या पूजनीय त्रिवेणीसंगम शब्दातील ‘‘तप’’ हा शब्द विसरला गेल्याने चित्त हा शब्द वेगळा पडला आणि अनवधानाने किंवा दुष्टबुद्धीने अनावश्यक रीतीने, चिता, प्रेत, स्मशान ह्यांना जोडला गेला. ‘‘तप’’ या शब्दाचे स्मरण जर सतत कायम राहिले असते तर त्याच्या अर्थव्यत्वामुळे चित्त हा शब्द असा अयोग्य रीतीने फरफटत नेण्याचे धैर्य कोणासही होऊ शकेल नसते. तप हा शब्द गळला गेल्याने पावन हा उपशब्द चित्तपावन ह्या शब्दाअंतर्गत अनायासेच निर्माण झाला हे खरे; पण ‘‘पावन’’ ह्या मुळात अत्यंत चांगल्या असणार्या शब्दामुळे प्रत्यक्षात फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झाले, हे खालील उतार्याहून लक्षात येईल. ‘‘चित्तस्थानी पावन झाले ते चित्पावन असेही एक मत आहे. चितेतून निर्माण झालेले अशा अर्थाने चित्तपावनांची हेटाळणी होऊ लागली. म्हणून चित्तपावन म्हणू लागले अशी एक कल्पना आहे’’ - भारतीय संस्कृति कोश, खंड तिसरा, पृष्ठ 402. ‘‘जहाज फुटल्यामुळे काही प्रेते वाहात येत आहेत असे परशुरामाने सह्याद्रीच्या टेकडीवरून पाहिले. त्या प्रेतांना त्यांनी जिवंत करून ‘ब्राह्मण धर्म’ शिकविला ती जागा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील वसिष्ठी नदीच्या काठावरील 40 मैलाचा किनारा’’ (ब्राह्मणांतील भिन्नशाखीय विवाह, पं.दिवेकर शास्री, पृ.53.) स्मशान आणि प्रेत ह्यांच्याही जोडल्या गेलेल्या सपशेल निराधार दुदैवी अपसमजामुळे भांबावून जाऊन काही चित्पावनांनी ‘‘आपण देशस्थ असून, आंबेजोगाईहून कोकणांत आलो असे सांगण्याचा अयशस्वी-अयोग्य प्रयत्न केला; पण ही भ्रामक समजूत आहे’’. - (भारतीय संस्कृतिकोश. खंड तिसरा, पृष्ठ 402.) चित्त ह्या शब्दावरून अर्थ अगदी दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न झाले. ‘‘क्षिती पावन या शब्दापासून चित्पावन हा शब्द असे श्री.गा.कृ.मोडक ह्यांनी प्रतिपादले, क्षिती म्हणजे जमीन, ती खणून साफ करणारे तिला पावन करणारे असा त्याचा अर्थ आहे’’. (भारतीय संस्कृतिकोश, खंड तिसरा, पृ.402). क्षिती - पावन आणि चित्तपावन ह्या शब्दाचा अर्थाअर्थी काहीच संबंध वाटत नाही. आदर्श शब्दकोशामध्ये ‘‘क्षिती’’ या शब्दाचा ‘‘खराबी, नासाडी, र्हास, उतरती कळा, क्षय’’ असा सुध्दा सर्वमान्य अर्थ दिलेला आहे. चिपळूण आगमनापासून बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या पेशवेपदप्राप्तीपर्यंत नव्वद टक्के चित्पावन वेदांचे अध्ययन व अध्यापन सांभाळून शेती करीत. जमीन सुपीक नसली तरी कष्टाळूपणे उत्तम शेती करीत. उत्तम शेतकरी ह्या अर्थाने त्यांना भूमिपुत्र म्हणताही येईल. तरीपण चित्तपावन व क्षितीपावन ह्या शब्दांचा एकमेकांशी संबंध जोडता येणार नाही. ‘‘ काहींच्या मते चित्पावन हा शब्द चित्तिपावन या शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहे (चित्ती = यज्ञ) चित्ती करून पावन झाले ते चित्पावन’’ (भारतीय संस्कृतिकोश, खंड 3 पृष्ठ 402). पावन हा शब्द तसा फार चांगला आहे. पावन शब्दाचा अर्थ आहे पुनीत, पवित्र, तथापि पावन शब्दावरून त्यांच्यावर काही ग्रमण्ये झाली होती, काही आरोप झाले होते. त्यांना काही सत्वपरीक्षा-अग्निपरीक्षा द्याव्या लागल्या होत्या. त्यामधून ते यशस्वी बाहेर पडून शुद्ध झाले असा हानिकारक अप्रत्यक्ष अर्थ निघू शकतो, असे म्हणतात. मूळ शब्द चित्तप आहे, चित्त नाही. पावन हा शब्द चित्तप-वन ह्या शब्दातील उच्चाराच्या लकबीमुळे अकल्पितपणे सुयोगाने आलेल्या आहे, हे ह्या संदर्भात लक्षात घेणे योग्य होईल. पावन हा शब्द सकृत्दर्शनी चांगला असला तरी पावन ह्या शब्दाकडे फार लक्ष वेधले गेल्यास पावन करून घेतले होते, म्हणजे पावन करून घेण्यापूर्वी काय झाले होते? चित्ताने पावन आहेत म्हणजे शरीराने नाहीत काय? असे आधाररहित कुतर्क विघ्नसंतोषी-उपद्रवी लोक काढतात. ‘‘चित्त’’ आणि ‘‘पावन’’ हे शब्द वेगळे वेगळे छान वाटत असले, तरी एकत्र आल्यास अनावश्यक गोंधळ निर्माण करतात. ‘‘पावन’’ ह्या शब्दामध्ये आरोपमुक्तीची म्हणजे आरोप केला गेला अशी झाक विनाकारणच ध्वनित होते असे म्हणतात. अपसमज अनुल्लेखाने नाहीसे होत नाहीत. त्यांचे शास्रशुद्ध निराकरण केल्याने नाहीसे होतात. ह्या विश्वासाने ईश्वरसाक्ष सद्हेतूने वरील विस्तृत उतारे दिले आहेत. चित्तप ह्या शब्दाचा संबंध तप ह्या शब्दाशी आहे, एका मान्यवर वैदिकवर्गाशी आहे. चित्त ह्या शब्दाचा आणि विशेषत: चित्तप ह्या शब्दाचा अंतर्भूत असणार्या चित्त ह्या शब्दाचा संबंध मनाशी आहे, आत्म्याशी आहे, चैतन्याशी आहे. " First of all, let us take chitta. It is the mind stuff a part of Manat - it is the generic name for the mind itself, including all its various states", - Swami Vivekananda. चित्तप आणि चित्त हे दोन्ही शब्द भव्य आहेत, रम्य आहेत, दिव्य आहेत, गौरवपर आहेत, अस्मिता वाढविणारे आहेत. गीतेच्या सहाव्या अध्यायात सत्तेचाळीसपैकी चार श्लोकांत चित्त शब्द आला आहे इतका तो महत्त्वपूर्ण आहे. चित्तुर (चित्त-उर) चित्तरंजन, चित्तगांव अशी अनेक महत्त्चपूर्ण ‘‘चित्त’’ शब्दयुक्त गांवे व परिसर आहेत. ह्या गावांना चित्त या शब्दांचा काहीच त्रास उपसर्ग झाला नाही. त्याच्या शब्दातील चित्त ही अक्षरे प्रेताशी, चितेशी, मुळीच जोडली गेली नाहीत. मंगलतेशीच जोडली गेलीत. चित्त्पावनांच्या संदर्भातच मात्र चित्त ही अक्षरे (दृष्ट बुद्धीने का होईना) पण चित्तेशी प्रेताशी का जोडली गेली? ह्याचा गंभीरपणे विचार करावयास पाहिजे. चित्त ह्या शब्दाचा संबंध चित्तेशी, प्रेताशी जोडण्याचे धैर्य उपद्रवी लोकांना होऊ शकेल ह्याचे कारण म्हणजे तप ह्या शब्दाचे विस्मरण. चित्तपावन, चित्पावन, चित्ततपावन ब्राह्मण, चित्तप ब्राह्मण, कोकणस्थ ब्राह्मण, चिपळुणे ब्राह्मण ह्या सर्व समानार्थी संज्ञा आहेत हे सुस्पष्ट करून, चित्तपावन किंवा चित्पावन हा शब्द चित्त-तपवन ब्राह्मण किंवा चित्तपवन ब्राह्मण असा लिहिणे योग्य होईल. बोलताना उच्चार करताना जरी चित्पावन किंवा चित्तपावन म्हटले तरी लिहिताना चित्ततपावन असेच कटाक्षाने लिहिणे चालू करावे म्हणजे कोणत्याही अपसमजाला तीळभरसुध्दा वाव राहणार नाही आणि आपण तपस्वी आहोत, ह्याचेपण स्मरण राहील. वन ह्या भूतकाळातील शब्दाची आता तितकीशी आवश्वकता नसल्याने ‘‘वन’’ हा शब्द गाळून चित्पावन ब्राह्मणांनी स्वत:ला नुसते ‘‘चित्तप ब्राह्मण’’ किंवा ‘‘चित्ततप ब्राह्मण’’ म्हणवून घेणेसुद्धा अयोग्य होणार नाही. चित्पावन शब्दाला अनेक समानार्थी पर्याय असले तरी ‘‘तप’’ हा शब्द चित्पावन ह्या संज्ञेचा आत्मा आहे, जीवनसर्वस्व आहे. डॉ. सावजी यांच्या ‘संशोधना’ विषयी‘चित्पावन’ समाजाबद्दल आजवर अनेकांनी लिहिले आहे. त्यांतले बहुतेकजण चित्पावनांपैकीच आहेत. डॉ.सावजी हे चित्पावन समाजातले नसूनही त्यांना यासंबंधी लिहावेसे वाटले हे विशेष म्हणता येईल. चित्पावन समाजाबद्दल अकारण गैरसमज निर्माण झाले आहेत तेव्हा या समाजाची गुणवत्ता प्रकट करून या समाजास ‘न्याय’ द्यावा या हेतूने ‘चित्पावन ब्राह्मणांचा उगम व विकास’ हे पुस्तक डॉ.सावजी यांनी लिहिले आहे. त्यांच्या हेतूबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. पण एखादा निष्कर्ष आधी निश्चित करून मग त्याला अनुरूप असा युक्तिवाद करावा तसे त्यांच्या या ‘संशोधना’ चे झाले आहे. शास्त्रीय निकषांवर डॉ.सावजींचे हे संशोधन अभ्यासकांना मान्य होण्यासारखे नाही.1) चिता+पावन, क्षिती+पावन, चित्त+पावन अशा ज्या विविध व्युत्पत्ती आजवर सांगितल्या गेल्या आहेत त्यांमध्ये पावन हे उत्तरपद समान आहे; फक्त पूर्वपदाबाबत मतभिन्नता आहे. डॉ.सावजी मात्र चित्त+तप+वन अशा तीन शब्दांचे एकत्रित रूप म्हणजे चित्पावन असे म्हणत आहेत. असे म्हणायलाही हरकत नाही; पण त्यासाठी त्यांना किती ओढाताण करावी लागली आहे ते पाहण्यासारखे आहे : अ) तप (मूळ संस्कृत रूप तप:) + वन या शब्दांचा संधी तपोवन असा होतो. तप: + बल = तपोबल, तप:+धन = तपोधन, तप: + भंग = तपोभंग इत्यादी सर्व उदाहरणांत संधीचा हा नियम कटाक्षाने पाळलेला आहे. (विसर्गापूर्वी ‘अ’ आणि विसर्गानंतर मृदु व्यंजन असल्यास विसर्गाऐवजी ‘ओ’ हा स्वर येणार हा नियम निरपवाद आहे. तपश्चर्या, तप:सामर्थ्य इ.शब्दांत विसर्गानंतर कठोर व्यंजने आल्यामुळे वेगळी रूपे बनली आहेत). ज्या काळात संस्कृतचे अध्ययन सर्वत्र केले जात होते त्या काळात ‘तपवन’ सारखे चुकीचे रुप कुणी स्वीकारणे शक्यच नव्हते ज्यांच्या उच्चारण शुद्धतेबद्दल - डॉ.सावजी कौतुकाने प्रशंसोद्गार काढतात. त्यांना ‘तपवन’ असला व्याकरणदुष्ट शब्द उच्चारायला केवळ आपल्या नव्या ‘संशोधना’ पायी डॉ.सावजी भाग पाडत आहेत ! आ) चित्त आणि तप हे दोन शब्द मिळून ‘चित्तप’ असा शब्द बनला आणि हा समाज ‘चित्तप’ ब्राह्मण म्हणून ओळखला जात होता अशी कसरत डॉ.सावजी यांना करावी लागली आहे. या ‘चित्तप’ ला कसलाही ग्रंथिक किंवा लोकव्यवहारातील आधार नाही. कोकणस्थानी पुन्हा ‘चित्तप’ ब्राह्मण असे स्वत:ला म्हणून घ्यावे असे डॉ.सावजी सुचवीत आहेत. त्यांचे हे मार्गदर्शन कुणीही मनावर घेणार नाही, हे उघड आहे. इ) ‘चित्त’ आणि ‘तप’ या शब्दांची जी महती डॉ.सावजी यांनी सांगितली आहे ती येथे अप्रस्तुत आहे. अध्यात्मशास्त्रात जे ‘अंत:करण-पंचक’ वर्णिले जाते त्यात अंत:करणाखेरीज मन, बुद्धी, चित्त व अहंकार हे घटक येतात. त्यांतील केवळ चित्त या शब्दाचे गीतेतील उल्लेख सांगण्याने काही विशेष साध्य होत नाही. कारण गीतेमध्ये अंत:करण व बाकीच्या सर्व घटकांबद्दल ही अनेकदा विवेचन आले आहे. एखादा शब्द गीतेच्या कुठल्या अध्यायात किती वेळा आला आहे हे मोजत बसणे ही केवळ आकडेमोड होय. ई) ‘तप’ हा शब्द धर्माचरण, पुण्यकर्म या अर्थाचा आहे. ‘12वर्षांचा कालावधी’ असा ‘तप’ चा आणखी एक अर्थ आहे. या दोन अर्थांमुळे तप म्हणजे कठोर व्रतसाधना, निग्रहाने शरीरदंडपूर्वक केले जाणारे शुद्ध आचरण अशी या शब्दाची प्रतिमा लोकमानसात तयार झाली आहे. तप करणे ही केवळ चित्पावन ब्राह्मणांची ‘खासियत’ आहे असे सुचविणे म्हणजे इतरांवर अकारण अन्याय करण्यासारखे आहे. प्राचीन काळात आजच्या तुलनेने धर्माचरण सर्वत्र केले जात असे. पैठण, नाशिक, पंढरपूर, वाई, कोल्हापूर, औदुंबर अशी महाराष्ट्रातील मोठी तीर्थक्षेत्रे देशावर आहेत. गोदावरी, कृष्णा, भीमा, पंचगंगा या नद्यांकाठी असलेली ही क्षेत्रे ‘तपोभूमी’ (तपभूमी नव्हे!) या संज्ञेला अधिक पात्र आहेत. प्राचीन महाराष्ट्राला ‘दंडकारण्य’ अशी संज्ञा होती. या दंडकारण्यात कोकणाचाही समावेश होता असे मानले तरी कोकणाची प्रसिद्धी ‘अपरान्त’ (पश्चिमेचा जेथे शेवट होतो तो भूप्रदेश) ही होती. एकंदरीने ‘तप’ आणि ‘वन’ हे शब्द प्राचीन काळात लावायचेच तर सर्व भारताला अनुलक्षून लावता येतील. वेदविद्येचे जतन फक्त कोकणात झाले हे अनुमान टिकणारे नाही. तेव्हा डॉ.सावजी यांची चित्त+तप+वन ही व्युत्पत्ती अथपासून इतिपर्यन्त केवळ सदोषच नव्हे तर भ्रममूलकही आहे. 2) इ.स.1265 मध्ये यादव वंशातील राजा महादेव याने गुजरातवर स्वारी करून तो प्रदेश जिंकला. उत्तर कोकणच्या ठाणे येथील शिलाहार वंशाच्या राजालाही त्याने पराभूत केले ही इतिहासात नोंद झालेली घटना आहे, पण एवढ्या घटनेवरून सामवेदी ब्राह्मणांच्या स्थलांतराची आणि चिपळूण येथे ‘चित्ततपवन’ रूपाने त्यांचे पुनर्वसन झाल्याची अवास्तव कहाणी डॉ.सावजी यांनी रचली आहे तो केवळ त्यांच्या कल्पनेचा खेळ आहे. सोपारा येथे दहा हजार सामवेदी ब्राह्मण होते ते सर्वच्या सर्व समुद्रमार्गे दाभोळला व तेथून चिपळूणला पोचले व तेथे त्यांनी नव्याने वसाहत केली या डॉ.सावजी यांच्या म्हणण्याला कसलाही आधार नाही. डॉ.सावजी सांगतात ते ‘सोपारा’ हे त्या काळात एक बंदर होते आणि व्यापाराचे केंद्र होते. उत्तर कोकणातील शिलाहारांच्या राजधानीचे ठिकाण स्थानक (किंवा आजचे ठाणे) हे होते. शिलाहारांचे आरमार यादवांनी नष्ट केले ते घारापुरी या ठिकाणी असे इतिहासकार मानतात. आरमार बुडविण्याचा सोपार्याशी काही संबंध नाही. तेव्हा पुनर्वसाहतीसाठी या सामवेदी ब्राह्मणांनी चिपळूण हेच ठिकाण (त्यातही वासिष्ठी नदीचा फक्त उत्तरेचा तीर) निवडल्याबद्दलचे डॉ.सावजी यांचे विवेचन केवळ काल्पनिक आहे. 3)चिपळूण हा भाग उत्तर शिलाहारांच्याच आधिपत्याखाली होता. तो या आरमारी युद्धानंतर यादवांच्या ताब्यात आला. मुख्य म्हणजे सोपारा येथे ‘सामवेदी’ ब्राह्मणांचा छळ करून त्यांना हुसकावून लावण्याचे यादव राजांना काही कारण नव्हते. त्या काळातील पद्धतीनुसार यादव राजांनीही ब्राह्मणांना आश्रय दिला एवढेच नव्हे तर त्यांना अग्रहार आणि दानपत्रे दिली असेच उल्लेख मिळतात. यादवांची राजवट 14 व्या शतकाच्या प्रारंभी नष्ट झाली आणि नंतर बहामनी शाह्या स्थापना झाल्या. श्रीवर्धनजवळ जंजिरा येथे औरंगजेबाच्या आरमाराचा सीदी हा हबशी प्रमुख होता. त्याची वागणूक क्रूरपणाची होती. तेव्हा ‘सुरक्षित’ ठिकाण म्हणून वसाहतीसाठी चिपळूण हे स्थान निवडले हे डॉ.सावजींचे मतही टिकणारे नाही. 4) सामवेदी ब्राह्मणांनी पुनर्वसनासाठी चिपळूण हे ठिकाण निवडले. हेच ते चित्पावन ब्राह्मण हे डॉ.सावजींचे ‘संधोधन’ कच्च्या पायावर आधारलेले आहे. चित्पावन समाज बहुतांशी ऋग्वेदी आहे, काही थोडे यजुर्वेदी आहेत. मात्र सामवेदी चित्पावन आढळत नाहीत. यज्ञयागासाठी चारही प्रमुख शाखांचे वैदिक असावे लागतात; त्यासाठी मुद्दाम काही जणांना सामवेदाचे शिक्षण घ्यावे लागते. जन्मत: कुणीही चित्पावन सामवेदी शाखेचा नाही. सोपारा येथील दहा हजार सामवेदी ब्राह्मण चिपळूणला जर आले होते तर त्यांनी सामवेदाचा त्याग का केला, याबद्दल डॉ.सावजी काहीही सांगत नाहीत. सर्व वेदांमध्ये ऋग्वेद हा प्राचीन व महत्त्वाचा वेद मानला जातो व तीच चित्पावनांची शाखा आहे. कोकणातल्या चित्पावनांची कुलस्वामिनी कोकणापासून दूर असलेल्या मराठवाड्यातली अंबेजोगाईची योगेश्वरी कशी, याबद्दलही डॉ.सावजी काही सांगत नाहीत. 5)इ.स.1265 च्या स्थलान्तरानंतरच चित्पावन समाजाला स्वतंत्र आस्तित्व प्राप्त झाले या म्हणण्यालाही काही अर्थ नाही. या समाजाचा उदय तेराव्या शतकात झाला हा निष्कर्षही इतिहासाला धरून नाही. प्राचीन महाराष्ट्राच्या अभ्यासकांनी जी संधोधन-साधने महत्त्वाची व विश्वसनीय मानली आहेत, त्यात दिवे-आगर येथील शक 982 चा (म्हणजे इ.स.1060) ताम्रपट उल्लेखनीय आहे. या ताम्रपटात जी व्यक्तिनामे आली आहेत त्यांत घैसास, देवलु (देवल) मावल भट्ट (महाबळ भट) ही नावे येतात. घैसास, देवल व महाबळ ही कुलनावे (किंवा आडनावे) फक्त चित्पावनात आहेत. तेव्हा या आडनावांचे चित्पावन अकराव्या शतकातही होते हे उघड आहे. वस्तुत: चित्पावन समाज याआधीही काही शतके समाजमान्य होता असे मानणे सुसंगत ठरते. 6) चित्पावन नसूनही या समाजाबद्दल डॉ.सावजी यांना सांगावेसे वाटते आणि वैद्यकीय पेशाचे असूनही त्यांना मानववंशाबद्दल आस्था आहे एवढी बाब सोडली तर ‘चित्पावन ब्राह्मणांचा उगम आणि विकास’ या त्यांच्या पुस्तकातील संशोधन मुळीच मान्य करता येत नाही. एखाद्या समाजाची प्रशंसा केली काय किंवा त्याला दूषणे दिली काय दोन्ही सारखेच अप्रस्तुत ठरते. कुठलाही समाज असतो त्याप्रमाणे चित्पावनही गुणदोषांनी युक्त आहेत असेच म्हणावे लागते. |