निसर्गरम्य परिसर लाभलेल्या हेदवी या गावाचे एका कुशीत डोंगराचे मध्यभागी, भव्य किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन बांधणीची वास्तू आहे ती म्हणजे, सर्वांचे आराध्यदैवत असलेल्या दशभुजा श्री लक्ष्मीगणेशाचे मंदिर. पेशवेकालापासून थेट १९४४ पर्यंत अनेक गणेश भक्त मंडळीनी ह्या मंदिराची देखभाल केली. १९४४ ते १९५७ पर्यंत श्री.वामन त्र्यंबक ऊर्फ तात्यासाहेबांनी वेळोवेळी आपल्या कुटुंबियांना सेवाव्रतात गुंतवून मंदिराची व उत्सवाची जबाबदारी पार पाडली; पण पेशवेकालीन ही वास्तू हळूहळू जीर्ण होऊन मोडकळीस आली. श्री.शिवराम गोविंद ऊर्फ काकासाहेब यांनी जीर्णोद्धाराची योजना तयार करून कार्यान्वित केली.अनेक मित्र, स्नेही व गणेशभक्त यांचे सहकार्य, जबरदस्त जिद्द व धडपड करून अनेक वर्षे पायरीपायरीने जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण करून सफल केले. गेली कित्येक वर्षे माघी पौर्णिमेला हेदवीस गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हेदवी हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात असून चिपळूण, गुहागरमार्गे हेदवीला एस.टी.ने किंवा खाजगी गाडीने पोचता येते. मंदिराशेजारीच उतरण्यास, भक्तनिवासत सोय होऊ शकते. ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराने काकासाहेबांनी इतर जोगळेकर व अन्य मंडळींनी एक आदर्शच घालून दिला आहे.