सौ वसुधा आपटे : एक चित्पावन_ब्राह्मण

Back to News

आकाशाचे_खांब

डॉ वसुधा आपटे या साध्यासुध्या डॉक्टर नाही.

त्यांच्याखेरीज न्यायवैद्यक शास्त्र (forensic medicine) या पुरुषप्रधान क्षेत्रात गेली ४५ वर्षे सातत्याने कार्यरत असलेली उभ्या महाराष्ट्रात दुसरी स्त्री नाही ! संपूर्ण भारतात या क्षेत्रात आजच्या घडीला केवळ १४-१५ स्त्रियाच कार्यरत आहेत.

डॉ आपटे यांनी जेव्हा या कार्यक्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा आणि त्यानंतरही पुढची अनेक वर्षे शवविच्छेदन (Post mortem) करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील एकमेव स्त्री डॉक्टर होत्या. शवविच्छेदन (Post mortem) हा शब्द आपण सिनेमात, टीव्हीवर, पेपरमध्ये अथवा अपवादात्मक परिस्थितीत आपल्या आयुष्यात आपण प्रत्येकाने ऐकलेला असतो. मात्र post mortem हा forensic medicine या वैद्यकीय शाखेतील केवळ एक भाग असतो आणि त्याच्या पलीकडे कितीतरी गोष्टी या वैद्यकीय शाखेत अंतर्भूत असतात. या दृष्टीने Forensic medicine हा विषय भारतात अजूनतरी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा तसा पोहोचलेला नाही, असं डॉ आपटे आवर्जून सांगतात.

M.B.B.S. झाल्यावर विवाह झाल्यामुळे डॉ आपटे यांनी M.D. व LLB (G) या दोन महत्वाच्या पदव्या घरसंसार व नोकरी सांभाळून केल्या हे विशेष.

जावे त्याच्या वंशा...म्हणतात त्याप्रमाणे डॉ वसुधा आपटे ज्या क्षेत्रात काम करतात त्या कामाची कल्पना आपल्याला नुसत्या शब्दातून येणं अशक्य आहे. तुमचे रोजचे काम विविध मृत माणसांच्या शवाशी सबंधित असल्याने एका अर्थाने तुमची गाठ रोज मृत्यूशी होत असते. कुठल्या वयाची, कुठल्या पदावरील किंवा कुठल्या कारणाने मृत्यू झालेली व्यक्ती तुमच्या समोर येईल ते सांगता येत नाही. आत्महत्या, खून, संशयास्पद मृत्यू...काहीही असू शकेल. अशा वेळी मनाचा तोल ढळू न देता काम करावे लागते. शांतपणे मन एकाग्र ठेवून तुम्हाला शवविच्छेदन करावे लागते. शरीराच्या अवयवांची बाह्य व आतून तपासणी करावी लागते. त्यात कुठल्या अवयवांना इजा आहे, याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. शरीरात बंदुकीच्या बुलेट्स गेल्या असतील तर त्या स्वतःच्या हाताने काढाव्या लागतात. त्या सुरक्षितपणे, सापडल्या त्या अवस्थेत (न धुता) पिशवीत जपून ठेवाव्या लागतात. अशा एक ना अनेक गोष्टी. शवविच्छेदन झाल्यावर शरीराच्या आतील अवयव चिकित्सा झाल्यावर पुन्हा एकदा होते त्या जागी ठेवावे लागतात. मग शरीर पुन्हा शिवून नातेवाईकांकडे सुपूर्द करायचे असते. यात भावनांना अवाजवी महत्व न देता, तुम्हाला कमालीचे वस्तुनिष्ठ राहावे लागते. चिकित्सा करून शांत डोक्याने निष्कर्ष काढावे लागतात. बलात्कार, खून अशा केसेसमध्ये शव विच्छेदनामुळे अनेक तथ्ये बाहेर येतात. त्यामुळे न्यायालयास अचूक न्यायदान करणे सोपे होते. तसेच शवविच्छेदन करून झाल्यावर आपल्याला हवा तसा रिपोर्ट मिळण्यासाठी उच्च व्यक्तींकडून दबाव यायची शक्यता असते. आपल्या निष्कलंकीत आणि वस्तुनिष्ठ कारकिर्दीत अनेक लोकांना न्याय देता आला व दोषी व्यक्तींना शिक्षा झाली, याचे डॉ आपटे यांना अपार समाधान वाटते.

मुख्य म्हणजे एक स्त्री या नात्याने घर सांभाळायचे असते. मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण याची जबाबदारी अधिक असते. त्यामुळे आपण करत असलेल्या कामाचा परिणाम आपल्या घरावर होऊ द्यायचा नाही याची काळजी डॉ आपटे यांनी घेतली. यासाठी लागणारी ‘मानसिक शिस्त’ त्यांच्याजवळ होती, म्हणूनच ते शक्य झाले. आपली आपल्या कामावर निष्ठा असली आणि मनात येणाऱ्या विचारांचे योग्य नियोजन केले तर ही तारेवरची कसरत कठीण वाटत नाही, असे डॉ वसुधा आपटे अगदी सहजपणे सांगून जातात. एका दिवशी (मधे जेवणाचाही ब्रेक न करता केलेले) एकाच केसमधील चोवीस लोकांचे शवविच्छेदन करण्यासाठी मनाची काय पातळी लागत असेल याचा विचार करून आपण डॉ आपटे यांना मनोमन नमस्कार केलेला बरा !

मुंबईमधील टोपीवाला राष्ट्रीय वैदयकीय महाविद्यालय व नायर रुग्णालय येथे ३२ वर्षे व सुरत महापालिकेच्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्षे सेवा केलेल्या डॉ वसुधा आपटे यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. १९९५ मध्ये American Biographic Institute कडून Woman of the Year, सह्याद्री वाहिनीचा हिरकणी पुरस्कार, झी मराठी वाहिनीचा उंच माझा झोका पुरस्कार, नुकताच १५ ऑगस्ट २०१८ रोजी सुरत येथे मिळालेला ‘Noble Asian of the Year’ असे अनेक पुरस्कार आहेत.

निवृत्त झाल्यावर डॉ आपटे सध्या Medico-Legal Consultant म्हणून कार्यरत आहेत. नोकरीच्या काळात इंग्रजीत लिखाण केल्यावर त्यांनी निवृत्तीनंतर मराठीत २०० हून अधिक लेख लिहिले आहेत. ‘गुन्हेगारांचा कर्दनकाळ – न्यायवैद्यक शास्त्र’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले असून नुकताच या पुस्तकाला २०१७ सालचा प्रथम क्रमांकाचा ‘सुप्रभात साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे.

एवढं प्रचंड कर्तुत्व असलेल्या डॉ वसुधा आपटे यांची एक ओळख थोडी वैयक्तिक परंतु अतिशय हृद्य आहे. न्यायमूर्ती रानडे व रमाबाई रानडे हे वसुधा ताईंचे पणजोबा-पणजी आहेत ! वसुधाताईंच्या वडिलांचा लहानपणीचा सांभाळ खुद्द रमाबाई रानडे यांनी केला आहे. त्यामुळे घरातील प्रत्येकाला सरस्वतीचे वरदान आहे. इतकंच नाही तर न्यायमूर्ती रानडे जी स्त्री पुरुष समानता समाजात रुजवू पाहत होते, ती सम्यक दृष्टी वसुधा ताईंनी आपल्या कुटुंबातील प्रत्येकात रुजवली आहे. समाजात स्त्री पुरुष समानता वाढीस लागावी, व समाजाचा स्त्रियांकडे पहायचा दृष्टीकोन अधिक निकोप व्हावा यासाठी सत्तरी उलटून गेलेल्या वसुधाताई आजही महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी प्रवास करून व्याख्यानांतून समाज प्रबोधनाचे काम करत आहेत !

‘इतकी वर्षे या क्षेत्रात काम केल्यामुळे मृत्यूची भीती कमी झाली. जगण्यावरचे प्रेम अधिक वाढले. आपल्या जगण्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आपण तो आनंदाने जगला पाहिजे. आपला रिकामा वेळ आपल्या आवडीच्या गोष्टी, छंद यात व्यतीत केला पाहिजे. मुख्य म्हणजे, आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेतले पाहिजे – म्हणजे आपला आनंदही द्विगुणित होतो.’ इतकी वर्ष रोज ‘मृत्यूसोबत’ काम केलेल्या डॉ वसुधा आपटे यांची जगण्याविषयी साधीसुधी फिलोसॉफी आहे.

डॉ वसुधा आपटे या साध्यासुध्या डॉक्टर नाही, हे सुरुवातीला म्हटले ते याचसाठी !