भारताचे अतिप्राचीन वाङ्मय. वेदवाङ्मयाच्या रचनेचा काळ 5 ते 6 हजार वर्षांपूर्वीचा मानतात. वेदांत मूळ ऋग्वेद व त्यानंतर यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद होत. ज्या ऋषि / महर्षींनी ऋग्वेदाचे अध्ययन / अध्यापन केले ते ऋग्वेदी झाले. चित्पावनांनी पूर्वजांची ही वेदगंगा वश केली. पूर्वी अध्ययन / अध्यापन आश्रमांत / कुलगुरू किंवा कुलऋषीकडे / गुरुकुलांत होत असे. गुरुकुलात जे मुमुक्षु अध्ययनाला येत त्यांना कुलऋषीकडून गोत्र प्राप्त होत असे. कालांतराने त्या त्या शाखेतील त्या त्या गोत्राने ओळखले जाऊ लागले.
चित्पावनांत अशा प्रकारची चौदा गोत्रे वंशपरंपरेने चालत आलेली आढळतात.
कुलऋषि | गोत्र |
---|---|
काश्यप | : काश्यप, शांडिल्य |
वासिष्ठ | : वासिष्ठ |
अंगिरस | : कौण्डिण्य, विष्णुवर्धन, नित्युंदन |
भारद्वाज | : भारद्वाज, गार्ग्य, कपि |
भृगू | : जामदग्नी, वत्स |
विश्वामित्र | : ब्राभ्रव्य, कौशिक |
अत्रि | : अत्रि |
गोत्रे, प्रवरे व कुलऋषी यांवरून त्या कुलाच्या परंपरेचा बोध होतो. गोत्रे व प्रवरे यांची माहिती आश्वलायन व बौद्धायन या सूत्रग्रंथावरून मिळते. आश्वलनीय अग्नीची प्रार्थना करणाऱ्या ऋषीस प्रवर म्हणत. हे प्रवर वेगवेगळ्या गोत्राचे असत. एक, तीन, पाच प्रवर असत. प्रत्येक गोत्रांत ३ किंवा ५ प्रवरे मानतात. चित्पावनांमध्ये जास्तीत जास्त ऋग्वेदी आश्वलायनी असून बाकीचे हिरण्यकेशी (आपस्तंभ) आहेत. जामदग्नी व वत्स गोत्रे पंचप्रवरी असून बाकीची गोत्रे त्रिप्रवरी आहेत.
अग्नीचे आवाहन ज्या आदि महर्षींनी केले ते सप्तर्षी नावाने ओळखले जात.