चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई तर्फे रविवार, दिनांक २० एप्रिल, २०२५ रोजी ‘मराठी साहित्य मंदिर’, सेक्टर 6, वाशी येथे “कला-देई-स्कोप” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष होते. कार्यक्रमा मध्ये सव्वादोनशे पेक्षा जास्त मेंबर्सची उपस्थिती होती. दरवर्षी या कार्यक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद वाढत्या आलेखाचा व उत्तम प्रतिसादाचा आहे; त्यावरून हे स्पष्ट होते की कार्यक्रमाचा स्तर उंचावतो आहे, तसेच ज्ञातीतील लोकांना अशा प्रकारचे कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात हवेहवेसे वाटत आहेत.
चित्पावन फाउंडेशन हे आपल्या ज्ञातीतील बंधू-भगिनींच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करत असते.
आपल्या समाजातील लोकांनी एकत्र येण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम करावा या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. बाहेरचे प्रोफेशनल आर्टिस्ट बोलवणे हे तर केव्हाही शक्य आहे; परंतु आपल्या CFNM ग्रुप मधील मेंबर्समध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना हक्काचे स्टेज उपलब्ध व्हावे या दृष्टीने आपल्या चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई ग्रुप मधील मेंबर्सना कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारच्या कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
आश्चर्याची आणि आनंदाची बाब ही की कोर कमिटीच्या आवाहनाला अतिशय भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची वेळ बघता एन्ट्रीज बंद कराव्या लागल्या. यात अगदी दहा-बारा वर्षाच्या लहानग्यापासून ७५ वर्षांपर्यंतच्या आजोबांपर्यंत सर्व वयोगटाचे लोक सामील झाले होते.
यामध्ये गाणे, वाद्य वादन, नृत्य, नाटक, काव्यवाचन इ. अनेक प्रकारच्या कलागुणांना वाव देण्यात आला होता. कार्यक्रम रंगतदार व्हावा व एकसुरीपणा टाळावा; ह्या हेतूने त्याचा सिक्वेन्स ही आकर्षक पद्धतीने ठरवण्यात आला होता.
मागील दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता आयत्यावेळी होणारी धावपळ टाळली जावी तसेच कलाकारांना उत्तम तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जवळपास दोन पेक्षा जास्त महिने आधीपासून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कलाकारांना नावे नोंदवण्यापासून ते कार्यक्रमापर्यंत भरपूर वेळ मिळावा यासाठी उत्तम आखणी करण्यात आली होती.
कलाकारांच्या निवडीसाठी नोंदणी केलेल्या सर्व कलाकारांना दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये (श्री गजानन महाराज मंदिर, वाशी येथे) समक्ष बोलावून या कार्यक्रमासाठी नेमलेल्या वर्किंग कमिटीच्या सभासदांनी सर्व कार्यक्रम स्वतः पाहिले. त्यानंतर योग्य त्या कलाकारांची निवड करून कलाकारांना एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामावून घेतले. कलाकारांचा परफॉर्मन्स उत्तम व्हावा यासाठी कलाकारांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या.
रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी "कला-देई-स्कोप" या संपूर्ण कार्यक्रमाची रिहर्सल, नेरूळ जिमखाना येथे आयोजित करण्यात आली होती. यासाठी श्री. अभी गद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावर्षीचा कार्यक्रम थोडासा नाविन्यपूर्ण असावा यासाठी वर्किंग कमिटीने विशेष आखणी केली होती. कार्यक्रमांमध्ये तोच तोच पणा येऊ नये आणि दरवर्षी मागील वर्षीपेक्षा होणारा कार्यक्रम अधिकाधिक उंचीवर पोहोचला पाहिजे याकडे वर्किंग कमिटीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. त्यासाठी सर्व कोर कमिटीने एकत्र बसून चर्चा करून विविध पर्यायांचा विचार केला होता. नऊ जणांची वर्किंग कमिटी स्थापन करून त्यांना कार्यक्रमासंबंधीचे विशेष अधिकार ही देण्यात आले होते. वर्किंग कमिटीमध्ये श्री. निशिकांत परांजपे, सौ. प्राजक्ता परांजपे, सौ. माधवी गानू, श्री. प्रतीक साठे, सौ. सानिका ताम्हनकर, सौ. केतकी गोखले, श्री. शशांक चितळे, श्री. सुनीत बापट व श्री. अभि गद्रे यांचा समावेश होता.
कलाकारांच्या एन्ट्रीज करिता जवळपास एक सव्वा महिन्याचा अवधी देण्यात आला होता; जेणेकरून कलाकारांना पुरेसा वेळ मिळावा. त्याचप्रमाणे त्यांना तयारी करून वर्किंग कमिटी पुढे आपली कला सादर करण्यास सांगण्यात आले होते. यात कुठेही कोणालाही रिजेक्ट करण्याचा किंवा दुखावण्याचा प्रश्न नसून उत्तम तयारी असलेल्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळावी व प्रेक्षकांना उत्तम कार्यक्रम पाहण्याची संधी मिळावी हा उद्देश होता. कलाकारांना सादरीकरणाविषयी काही सजेशन्सही करण्यात आल्या.
रविवार, दिनांक २० एप्रिल, २०२५ रोजी, कार्यक्रमाच्या ठिकाणी, मराठी साहित्य मंदिर, येथे बॅनर्स लावणे, खुर्च्यांची व्यवस्था, पाणी- चहा वाटप, कुपन्सचे वाटप इत्यादी अनेकविध जबाबदाऱ्या कमिटीच्या लोकांनी वाटून घेतल्या होत्या. यामध्ये श्री. मिलिंद गानू , श्री. निशिकांत परांजपे, श्री. संतोष नेने, सौ. सायली नेने, श्री. अभी गद्रे, यांचा विशेष सहभाग होता.
२० एप्रिल रोजी दुपारी ३:४५ वाजता सर्व कोर कमिटी मेंबर्स तसेच आपल्या चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबईच्या परिवारातील ह्या कार्यक्रमासाठी नोंदणी केलेला समस्त प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.
प्रथम स्टेजवर भगवान श्री. परशुरामाचे यथायोग्य पूजन करण्यात आले. त्यानंतर रंगदेवता आणि स्टेजची ही पूजा करण्यात आली. अभ्यागतांचं स्वागत सौ. माधवी गानू यांनी गणपती श्लोक म्हणून केले. त्यानंतर कोर कमिटीच्या मेंबर्सनी दीप प्रज्वलन केले व कार्यक्रमाची सूत्रे श्री. प्रतीक साठे यांच्याकडे सोपवण्यात आली. सर्व कलाकारांना कार्यक्रमात आपल्या कला सादरीकरणाच्या वेळी हजर राहण्यासाठी सौ. प्राची साठे, चि. यशराज नेने यांनी जबाबदारी घेतली होती. त्याचप्रमाणे कार्यक्रम सादर झाला की प्रत्येक कलाकाराला संस्थेतर्फे एक स्मृतिचिन्ह देण्यात आले. श्री. विवेक फडके सौ. स्वाती फडके व श्री. सुरेंद्र केतकर यांचे हस्ते स्मृतिचिन्हे देण्यात आली. त्यामध्ये आपल्या नेक्स्ट जेन ग्रुप मधील कु. तन्वी भातखंडे, कु. प्रतीक्षा बापट व कु. पूर्ण रेखी यांनी खूप मदत केली. साऊंड अरेंजमेंट व कलाकारांसाठी ट्रॅक ची व्यवस्था बघण्याचे काम श्री. प्रसन्न जोग यांनी अत्यंत कुशलतेने केले.
सभासदांनीही थोडा उशिराने का होईना, पण उत्तम प्रतिसाद दिला. जवळपास सव्वा दोनशे पेक्षा जास्त सभासदांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. मराठी साहित्य मंदिर, सेक्टर सहा, वाशी येथे संध्याकाळी साडेचार ते आठ या वेळात “कला-देई-स्कोप” हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
जवळपास ३० कलाकारांनी विविध प्रकारच्या कला अतिशय उत्तम रित्या सादर केल्या. काही जणांनी हिंदी चित्रपटातील गाणी सादर केली. काही जणांनी सोलो वादन केले. तीन छोटे स्किट्स असलेले एक छान नाटकही बसवण्यात आले होते. काही कलाकारांनी उत्तम पदलालित्य दाखवत नृत्य सादर केले. अशा विविध प्रकारच्या कला मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आल्या. सभासदांचा उत्साह वाहण्यासारखा होता. अनेक परफॉर्मन्सेसला प्रेक्षकांचा वन्समोरही मिळाला. डॉ. श्री. प्रतीक साठे यांनी निवेदनाचे आव्हानात्मक काम अतिशय लीलया व सफाईने केले. अशा पद्धतीने मेंबर्स कडून उत्तरोत्तर दरवर्षी याहीपेक्षा उत्तम प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
अशा रीतीने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करून व त्याचप्रमाणे तशी कार्यवाही पार पाडल्यामुळे अतिशय उत्तमरीत्या कार्यक्रम सादर झाला. अनेक नव्या नव्या ओळखीही झाल्या. श्री संतोष नेने यांनी समारोपाचे छान छोटेसे भाषण केले व सर्व उपस्थितांना धन्यवाद देण्यात आले.
सांगितीक कार्यक्रमानंतर चविष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी दादरच्या श्री. केतकर यांना केटरिंग कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. पुऱ्या, आम्रखंड, टोमॅटोचे सार, कटलेट, पुलाव असा उत्कृष्ट मेनू ठेवण्यात आला होता. कार्यक्रम व भोजन मिळून नाममात्र शुल्क रु. सहाशे प्रति व्यक्ती आकारण्यात आले होते.
श्री. आमोद ताम्हनकर व सौ. प्राजक्ता परांजपे यांनी कार्यक्रमाच्या व जेवणाच्या हॉलचे बुकिंग संबंधी व्यवस्थापन पाहिले.
या कार्यक्रमासाठी ‘मे. गांगल मोटर्स’, पनवेल (श्री. गांगल) व ‘मे. एएसएपी फूड्स’, घणसोली (श्री. अभी गद्रे आणि सौ. प्राजक्ता परांजपे) यांचेकडून प्रत्येकी रू. ५,००० देणगी स्वरूपात कुपन्स स्पॉन्सरशीप देण्यात आली होती.
वर्किंग कमिटीचे सर्व सभासद तसेच सर्व कलाकारांनी हा कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने आणि रंगतदारपणे पूर्ण व्हावा यासाठी अथक परिश्रम घेतले. त्याचे यथायोग्य कौतुकही उपस्थित प्रेक्षकांनी केले.