Shri Mahalaxmi Ashtami Pooja 2025 (Vashi, Navi Mumbai)

Back to Programs

श्री महालक्ष्मी (अष्टमीचे) पूजन - सोमवार, दि. २९ सप्टेंबर, २०२५ (कन्नड संघ हॉल, वाशी, नवी मुंबई)

(चित्पावन फाऊंडेशन, नवी मुंबई तर्फे आयोजित)

अश्विन शु. अष्टमीच्या दिवशी केली जाणारी श्री महालक्ष्मीची पूजा हा चित्पावन ब्राह्मणांचा एक कुळाचार आहे.
सुवासिनींकडून तो लग्नानंतर पाच वर्षापर्यंत केला जातो. कोणाचा कधी राहून गेला असेल तर त्या अशा पूजेत सहभागी होऊ शकतात.

नवरात्र हा एक प्रकारे स्त्री शक्ती पूजनाचा, तिच्या सृजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे. त्यातील एक रूप म्हणजे अष्टमीच्या दिवशी पूजन केली जाणारी महालक्ष्मी !!
काही चित्पावन ब्राह्मण कुटुंबे वगळता बहुतेक सर्व चित्पावन ब्राह्मण कुटुंबात हा कुळधर्म पाळला जातो.

नवरात्र म्हणजे सगळ्या सृष्टीत आनंदच आनंद, शरद ऋतूतील सुंदर हवामान, डुलणारी शेते, पाऊस पाणी मिळाल्याने धनधान्याची सुबत्ता वातावरण कसं ताजेतवानं..त्यात दुधात साखर म्हणजे आदी शक्तीचे देवीचे नऊ दिवस आगमन.

असे सांगितले आहे की देवांनाही सळो की पळो करून सोडणाऱ्या असुरांचा संहार करण्यासाठी उत्पन्न आदिशक्ति आदिमाया ही कधी शांत रूप घेऊन सरस्वती, कधी संपन्न रूप घेऊन महालक्ष्मी तर कधी रौद्र रुपात महिषासुरमर्दिनी, रेणुका, दुर्गा अशा स्वरुपात प्रकट होते आणि आपले सामर्थ्य दाखवते.
श्री शंकराचार्य म्हणतात, शिव जेव्हा शक्तियुक्त असतात तेव्हाच ते सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचा खेळ करू शकतात.

रविवार, दि. २८ सप्टेंबर, २०२५ रोजी म्हणजे पूजेच्या आदल्या दिवशी 'चित्पावन फाऊंडेशन, नवी मुंबई' च्या Core Committee च्या कार्यकर्त्यांनी रात्री ८:०० ते ११:३० मध्ये, कन्नड संघ हॉल, वाशी, नवी मुंबई येथे एकत्र येऊन साफसफाई, पूजेसाठी स्टेजची व्यवस्था, सजावट, देवाच्या मूर्तींची स्थापना, इतर सामानाची व्यवस्था इत्यादी करण्यात आली.

सोमवार, दि. २९ सप्टेंबर, २०२५ रोजी म्हणजे अष्टमीच्या दिवशी सकाळी, तांबे केटरर्स, ठाणे यांचे कडून आणलेल्या तांदळाच्या पिठीच्या उकडी पासून देवीचा मुखवटा करण्यात आला. श्री. जोशीं ह्यांनी देवीचा मुखवटा अतिशय मेहनतीने सुरेख पद्धतीने साकारला. प्रथेप्रमाणे तो मुखवटा पुरुषानेच तयार करावा लागतो; तसेच तो तयार करताना कोणी बघू नये म्हणून गुप्तता पाळावी लागते.

प्रथम तुळशीचे पूजन करण्यात आले. आलेल्या वशेळ्यांचे पाय धुण्यात आले. त्यांना ओवाळून त्या पूजेसाठी बसल्या. मग श्री महालक्ष्मीचे प्रतीक म्हणजेच अन्नपूर्णेचे पूजन करण्यात आले. आपल्याच चित्पावन फाऊंडेशन, नवी मुंबई परिवारातील सौ. मेघा गोखले यांनी यथायोग्य पद्धतीने पूजा सांगितली.

एकीकडे देवीचा मुखवटा तयार होत होता. अन्नपूर्णेचे पूजन झाल्यावर आरती करून सगळ्या वशेळ्यांचे भोजन झाले. त्यात एक मेहुण व एक कुमारिका सुद्धा होती.
दुपारी चार वाजता सर्व महिलांसाठी भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. पाटावर हत्तीचे चित्र चिकटवण्यात आले होते. पाटाभोवती फेर धरून पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणण्यात आली. मग सर्वांना खिरापत वाटण्यात आली.

भोंडल्याची गाणी कोणी लिहिली किंवा त्याच्या चाली ह्याविषयी काही सांगणे कठीण आहे; परंतु, वर्षानुवर्षे आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ती मौखिक स्वरुपात सुपूर्त होत आली आहेत. खरं तर पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर असलेल्या बंधनांमुळे कामाच्या व्यग्रतेतून थोडे मोकळे होण्यासाठी मिळालेले ते व्यासपीठ असते जणू.
ज्या भाविकांना देवीला साडी अर्पण करायची इच्छा असते त्यांची नावे संस्थेकडे नोंदवण्यात आली होती. लॉटरी पद्धतीने एका दाम्पत्याची निवड करण्यात आली. सौ. माधवी व श्री. मिलिंद गानू, नेरुळ  ह्या जोडप्याला हया वर्षी हा मान मिळाला.

संध्याकाळी ५:१५ वाजता देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व पूजेला सुरुवात झाली. सौ मेघा गोखले यांनी शास्त्रोक्त पद्धतीने यथासांगपणे पूजा कथन केली. ६:१५ पर्यंत पूजा झाल्यावर देवीची आरती करून सायंकाळी सात वाजता सर्वांना देवीचे दर्शन घेण्यास सांगण्यात आले. देवीचे दर्शन समाजाच्या सर्व घटकांसाठी खुले असते. फक्त काळे वस्त्र परिधान न करता यावे लागते.

त्यानंतर देवीच्या पुढ्यात घागरी फुंकण्याचा कार्यक्रम झाला. तसेच देवीच्या भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात आपल्या 'चित्पावन फाऊंडेशन, नवी मुंबई' परिवाराच्या श्रीमती ज्योती वाटवे, श्रीमती अपर्णा दाबके, सौ. स्वाती फडके आणि भजनी मंडळाचा महिला वर्ग ह्यांच्या समूहाने अतिशय सुरेल पद्धतीने गाणी सादर केली.
कुमारिकांचे पूजन करण्यात आले. साधारण १५ कुमारिकांचे पायावर दूध, पाणी घालून, औक्षण करण्यात आले. त्यात सर्व स्त्रियांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तगणांना संस्थेतर्फे प्रसाद वाटप करण्यात आला. रात्री अकराच्या सुमारास देवीची आरती करून मग देवीच्या मुखवट्याचे विसर्जन करण्यात आले.
आज आधुनिकतेच्या काळात निर्मळ पवित्र असणारा असा आनंदाचा ठेवा दुर्मिळ होत चालला आहे. तो आनंदाचा ठेवा जपण्यासाठी अशा उत्सव परंपरेचा वारसा जतन करणे आवश्यक आहे.

ह्या वर्षी मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या 'चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई' परिवारातील अनेक सदस्यांनी ह्या पूजेसाठी लागणाऱ्या विविध खर्चांसाठी आपणहून पुढे येऊन स्पॉन्सरशिप दिली होती. आपल्या ज्ञाती मधील सदस्यांच्या अशा सक्रिय सहभागातून, हे सिद्ध होते कि 'चित्पावन फाऊंडेशन, नवी मुंबई' आयोजित करत असलेले कार्यक्रम किती समाजाभिमुख, कालसुसंगत आणि त्यामुळे समाजप्रिय आहेत.

अशा रीतीने सर्वांच्या उपस्थिती आणि सहभागातून अतिशय पवित्र अशा वातावरणात श्री महालक्ष्मीच्या पूजेचा उत्सव आनंदात आणि उत्साहाने साजरा झाला.

© 2025 Chitpavanfoundation.org - All rights reserved.