सानिका ताम्हणकर ने ग्रुपवर विचारलं की आपण मंगळागौरीचे खेळ खेळु या का ? मेधा ताईं गोखले यांनी 'खेळायलाचं हवेत' असं सांगितल्या बरोबर, I am in चे मेसेजेस चालु झालेत. ग्रुप मध्ये एकदम उत्साही वातावरण ओसंडून व्हायला लागलं. आणि कार्यक्रमाची आखणी चालू झाली. कुठे,केव्हा, कसं या सर्व 'क' चे प्रश्न सानिका आणि ग्रुपने सहजरित्या सोडवलेत आणि चित्पावन ब्राह्मण संघाच्या वतीने मंगळागौरीचे खेळ श्री गजानन महाराज मंदिर सेक्टर २९ वाशी,नवी मुंबई इथं काल संध्याकाळी ४ते ७ या वेळात जवळपास ६० महिलांच्या सहभागाने आनंदपूर्ण वातावरणात पार पडले. छोट्या छोट्या मुलीसुद्धा नववारीत गोड दिसत होत्या. रंगीबेरंगी साड्या, मोगऱ्याचे माळलेले गजरे,त्याचा पसरलेला सुवास, बांगड्यांचे आणि फुगडीचे फु फु. आवाजाने हॉल चं एकटेपण काही तासांसाठी संपलं होतं. बघायला म्हणून आलेल्यांच्या मनात आपणही सहभाग घ्यावा हा विचार मनात आला नाही तर नवलचं.
पुर्वी महिलांना अशा एकत्रीकरण द्वारे एकमेकींशी हितगुज, तक्रारी करण्याची संधी मिळायची आणि तीसुद्धा मंगळागौरीच्या गाण्यांद्वारे एकमेकीं पर्यंत पोहोचायची...
दोघींच्या फुगडी ने चालू झालेला खेळ, बसकी फुगडी, गोफण, आगोटं पागोटंनी पुढे सरकत होता. जसं जसा महिलांचा सहभाग वाढत होता तसं तसं नवीन खेळाची आणि पर्यायाने संबंधित गाण्याची त्यात भर पडत होती. खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, अशा एकाहून एक खेळांपासून चालू झालेले खेळ अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासुबाई पर्यंत येऊन थांबलेत.
या खेळांमध्ये सर्वांगसुंदर व्यायामाचा लाभ महिला घेत होत्या. या महिलांमध्ये गृहकृत्यदक्ष महिलां पासून , महाविद्यालयीन मुली, कामकरी, उच्चपदस्थ महिलांनी आपलं पद, शिक्षण विसरून खेळाचा आनंद द्विगुणित केला. भारतीय परंपरेतील हे मंगळागौर खेळ एकत्रीकरण, शिक्षण, करिअर या व्यापात मागे पडत चाललं होतं.
दोन अडीच तासांपासून चालू असलेले हे खेळ असेचं चालू रहावेत असं प्रत्येकीला वाटत होतं परंतु वेळ मर्यादा आणि भुक यांनी वास्तवतेची जाणिव करुन दिली आणि पावभाजी तसचं गरमागरम कॉफी घेऊन आणि पुढच्या वर्षीही आपण असचं खेळायचं या आश्वासनाने कार्यक्रमाची सांगता झाली.