चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई आपल्या ज्ञातीच्या लोकांसाठी वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असते.
चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई चित्पावन फाउंडेशनच्या ऑब्जेक्टिव्हज नुसार आपल्या ज्ञातीच्या लोकांनी अनेक पातळ्यांवर प्रगती करण्यासाठी सर्वतोपरी योजना आखत असते व राबवित असते ; त्यामधील सर्व वयोगटासाठी एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे एक दिवसीय सहल.
यावर्षीच्या सहलीसाठी अलिबाग जवळ किहीम येथील "अमनसारा भिडे रिट्रीट" ची निवड करण्यात आली होती. साधारण सकाळी सात वाजता घणसोली येथून एक बस व नेरूळ येथून एक बस निघाली प्रत्येकी ५० सिटरच्या दोन बस होत्या. ९० सभासद ट्रीप साठी आले होते. ट्रीपचे हे तिसरे वर्ष होते व तिन्ही वर्षांचा सभासदांचा आकडा बघितल्यावर हे लक्षात येईल की दरवर्षी अधिकाधिक रिस्पॉन्स मिळतो आहे पहिल्या वर्षी म्हणजे २०२२ डिसेंबर मध्ये ५५ लोक ट्रीपला आले होते, मागच्या वर्षी २०२३ मध्ये साधारण ७५ लोक आले होते आणि यावर्षी २०२४ डिसेंबर मध्ये ९० लोक ट्रीप ला आले होते.
साधारण पावणेदहा वाजता दोन्ही बसेस रिसॉर्टला पोहोचल्या मग फ्रेश होऊन ब्रेकफास्ट व चहा / कॉफीची सोय करण्यात आली होती. मग पोट पूजा झाल्यावर ज्यांना स्विमिंग पूल मध्ये पोहायचे असेल किंवा ज्यांना समुद्रावर जाऊन पोहायचे किंवा फेरफटका मारायचे असेल त्यांना त्याप्रमाणे मनमुराद आनंद घेता यावा याचे नियोजन करण्यात आले होते. काही मंडळींनी छान पैकी नव्या ओळखी करून घेतल्या तर अनेक विविध वयोगटाच्या लोकांनी घोडा गाडी मध्ये , स्कूटरवर बसून फेरफटका तसेच समुद्राच्या पाण्यात मनसोक्त खेळण्याचा आनंद घेतला.
मग सर्वांनी साधारण एक सव्वा च्या सुमारास सर्वांनी सुग्रास चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. त्यात उकडीचे मोदक, डाळिंब्याची उसळ, पापड, सोलकढी, अशा खास कोकणी पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर हाउजी खेळ खेळण्यात आला; त्यात सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
त्यानंतर कोर कमिटीतर्फे विविध प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सौ. सायली नेने, श्री. संतोष नेने, चि. यश नेने, चि. ध्रुव नेने, चि. अथर्व ताम्हनकर, श्री. प्रसन्न जोग, चि. नील जोग, कु. शमात्मिका गद्रे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यातही सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महिलांसाठी तसेच यंग जनरेशन साठी सुद्धा विविध खेळ घेण्यात आले.
त्यानंतर श्री. प्रतीक साठे यांनी 'जगलिंग द बॉल्स' तसेच बॅलेंसिंगच्या वेगवेगळ्या खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यामागे केवळ करमणूक म्हणून नाही; तर मेंदू आणि अवयवांचा समन्वय विकास, स्ट्रेस मॅनेजमेंट, balancing स्किल्स वाढवणे असे अनेक फायदे ही असतात, हेही त्यांनी नमूद केले. अशा प्रकारे आपल्या समाजातील लोकांनी विविध कला , कौशल्ये आत्मसात करणे तसेच त्याचा आपल्या समाजातील लोकांसाठी हरप्रकारे फायदा कसा होईल ह्याचा दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे.
त्यानंतर सर्वांनी वाफाळता चहा / कॉफी आणि गरम गरम बटाटेवडे यांचा आस्वाद घेतला व संध्याकाळी अंदाजे सहा वाजता सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. अशा रीतीने नवनवीन लोकांच्या ओळखी होतात व एकमेकांशी असलेले संबंध दृढ होतात. तसेच सर्व वयोगटाच्या लोकांचा कुटुंबीयांसमवेत चांगल्या खेळकर पद्धतीने वेळ घालवल्यामुळे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.