चिपळूणजवळील परशुराम मंदिर हे चित्पावनांचे एक सर्वोच्च श्रध्दास्थान व तीर्थक्षेत्र आहे. सर्वच भारतीयांना ते प्रिय आहे.
इ.स.१२६५ मध्ये चित्पावनांच्या सोपारा परिसरातून ‘‘समुद्रमार्गे स्थलांतरित झालेल्या पूर्वजांनी दाभोळच्या खाडीतून प्रवेश घेतला. अंदाजे दहा हजार लोकांच्या वाड्या राहू शकतील एवढी विस्तीर्ण चित्ततपवन नामक आद्य पुनर्वसन छावणी ह्या खाडीस मिळणाऱ्या वसिष्ठी नदीच्या उत्तरकाठावर वसवण्यात आली. पुनर्वसन छावणीत काहीसे स्थिरस्थावर झाल्यावर आगमनापासून १ वर्षाच्या आतच, पुनर्वसन छावणीच्या मध्यवर्ती भागात पूर व परचक्र ह्यांपासून सुरक्षित केंद्रस्थानी चित्पावनांनी परशुराम मंदिराची निर्मिती व मूतींची स्थापना केली. सोपाऱ्याहून येवढ्या युद्ध-धामधुमीच्या काळात, अनेक वादळांमध्ये गलबते सापडण्याची शक्यता असतानासुध्दा चिपळूण परिसरापर्यंत सुखरूप पोहोचविल्याबद्दल कृतज्ञता बुध्दीने आणि तसेच परशुराम हे त्यांचे आराध्यदैवत असल्याने ह्या मंदिराची ताबडतोब स्थापना होणे स्वाभाविकच होते. सोपारा-दाभोळ ह्या समुद्री प्रवासात अनेकांनी तसा नवस पण केला असावा. त्यामुळेच चिंपळूणच्या परशुराम दैवताला समुद्री प्रवासातील विघ्नहर्ता म्हणून विशेष ख्याती प्राप्त झाली. हे देऊळ सामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे बांधले, त्यामुळे स्थापत्यदृष्टया ते फार मोठे व दिमाखदार नाही.
ह्या मंदिराच्या बाजूला रेणुकामातेचे हेमाडपंती पद्धतीचे मंदिर आहे. ते १२८५ च्या सुमारास यादवसम्राट रामचंद्र ह्याच्या संगमेश्वर-खेड विजयानंतर बांधण्यात आले असावे हे उघड आहे.
इ.स. १३१२ नंतर मलिक कफूर ह्या अलाउद्दीन खिलजीच्या सुभेदाराने ह्या मंदिराची नासधूस करण्याचा प्रयत्न केला.
"Kafur was a devout follower of Islam who's Religious duty was to demolish temples and construct mosques over them." _ Yadava's and their times. O.P. Varma. page 162.
तथापि मलिक कफूरचे लोक मंदिरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच भक्तजनांनी मंदिरातील मूर्ती सुरक्षितपणे गुप्त ठिकाणी हलविल्या होत्या. बहुधा गुहागरजवळ कुठेतरी त्या लपवून ठेवण्यात आल्या असाव्यात व त्यांचीच पुढे पुन:स्थापना झाली असावी. त्यामुळे इ.स. १३१२ पासून, इ.स. १६९८ मध्ये ब्रह्मेंद्रस्वामींनी जीर्णोद्धार करेपर्यंत तेथे मूर्ती नव्हत्या. (इ.स. १६९८ मध्ये ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, तोवर तेथे मूर्ती नव्हत्या.) सर्व पूजा, उपचार शिलासनालाच होत होते. पुढे गुहागरच्या परचुरे गृहस्थाने मूर्तींची स्थापना केली.’’
(चित्तपावन ब्राह्मण संघ, धंतोली, नागपूर स्मरणिका - १९९२, पृ.८.) परशुरामाच्या मूर्तींची पुन:स्थापना होईपर्यंत दक्षिण कोकणाची भूमी काहीशी नापीक राहिली आणि मूर्तींची पुन:स्थापना झाल्यावर दक्षिण कोकणाची भूमी हळूहळू प्रतिवर्षी अधिकाधिक सुपीक होत जाईल.’’ अशी लोकांची भावना होती असे म्हणतात. कोकणची भूमी निर्धारपूर्वक प्रयत्न केल्यास केरळ किंवा सिलोनप्रमाणे उपजाऊ व सुपीक होऊ शकते, हे सहज पटण्यासारखे आहे. त्या दृष्टीने योजना आखणे आवश्यक आहे.
मलिक कफूरच्या तुलनेने आदिलशाहीतील सुलतान बरेच सहिष्णु होते. त्यामुळे मंदिरातील शिलासनाची पूजा-अर्चा मुक्तपणे करणे शक्य झाले. तसेच मंदिराच्या कळसाचा व घुमटाचा जीर्णोद्धार करणेसुद्धा शक्य झाले. तथापि ह्या क्रियेत घुमटावर अभावितपणे (किंवा मशिदीपासूनचा फरक प्रकर्षाने लक्षात येऊन परत मूर्तिभंजकाचा रोष ओढवला जाऊ नये म्हणून) किंचित मुसलमानी पद्धतीची झाक केल्याचे भासत असे. सुदैवाने सध्या ह्या घुमटाचे नूतनीकरण व संपूर्ण भारतीयकरण करण्याचे सुयोग्य काम चालू आहे, ते लवकरच पूर्ण होईल. आदिलशाहीमधील विविध सुलतानांची परशुराम मंदिरावर बरीच भक्ती बसली होती व ते त्याला मानीत होते. त्याकाळी दक्षिण भारतामधून हजला जाणारे अधिकांश मुसलमान मक्केला निघण्यासाठी दाभोळ बंदराचा उपयोग करीत व प्रवासाला निघण्यापूर्वी परशुरामाला नवस करीत असत. ‘‘मन्नत कबूल करीत.’’ ‘‘दाभोळ म्हणजे विजापूरकर सुलतानाचे मुख्य बंदर, मक्का - मदिनेची यात्रा करून पुण्य जोडायचे तर दाभोळचे बंदर सोईचे पडे.’’ (आम्ही टिळक (कुलवृत्तान्त) इ.स. १९९४ पृष्ठ २९५.) परशुराम आणि समुद्रीप्रवासातील क्षेमता ह्याचे अतूट नाते सर्वधर्मीयांना मान्यहोते.
जंजिऱ्याच्या सिद्दी सुलतानाच्या जावयाचे गलबत समुद्रामध्ये वादळात फुटून तो बेपत्ता झाला होता, तेंव्हा सुलतानाच्या मुलीने परशुरामाला नवस केला होता. सहा महिन्यांनी तिचा नवरा जंजिऱ्याला सुखरूप पोहोचला, त्यामुळे तिची ह्या देवस्थानावर असीम श्रद्धा बसली. तिने देवालयाला तिसरा घुमट बांधला व देवालयास वार्षिक बाराशे रुपयांचे उत्पन्न सिद्दीच्या खजिन्यातून लावून दिले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाताना (चिपळूण अंदाजे आठ किलोमीटर असताना) परशुराम फाटा लागतो. ह्या फाट्याने एक किलोमीटर आत गेल्यावर परशुराम गाव व परशुराम मंदिर लागते. ह्या फाट्याच्या ठिकाणी पर्यटकांसाठी ‘वसिष्ठीदर्शन विसावा’ म्हणून स्पॉट केला आहे. तेथून वसिष्ठी नदीचे पात्र फार सुंदर दिसते. नदीची एकूण लांबी फक्त ३० किलोमीटर असली तरी पात्र मोठे आहे. येथे बसल्यावर चित्पावनांची आद्य पुनर्वसन छावणी कशी असेल ह्याची कल्पना मनात डोकावते. परशुराम गावात आजही वीस-पंचवीस चित्पावनांची घरे आहेत.
मुख्य गाभाऱ्यात परशुरामाच्या मूर्तीच्या उजव्या हाताला ‘काम’ आणि डाव्या हाताला ‘काळ’ देवाची मूर्ती आहे. काळ आणि काम ह्या दोन्हीवर विजय मिळविणारे परशुराम असा त्याचा आशय आहे. मंदिराच्या परिसराचा पर्यटनकेंद्र व तीर्थक्षेत्र म्हणून योजनाबद्ध नीट विकास करणे आवश्यक आहे. ह्या क्षेत्राच्या प्रचंड महत्त्वाच्या तुलनेत ह्या परिसराकडे आवश्यक तेवढे लक्ष अजून दिले गेलेले नाही.