श्री सप्तश्रृंगनिवासिनी महिषासुरमर्दिनी

Back to Articles

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेले सप्तश्रृंग निवासिनी महिषासुरमर्दिनीचे हे मंदिर नाशिकपासून साधारणत: 50 किलोमीटर अंतरावर आहे. काही जोगळेकर घराण्यांची ही कुलस्वामिनी आहे. या क्षेत्री जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला वणीमार्गे व दुसरा नांदुरीमार्गे. हे अर्धपीठ सप्तश्रृंग स्थान बरेच प्राचीन आहे. इ.स.पाचव्या किंवा सहाव्या शतकात डोंगरकपार तोडून हे स्थान बनविलेले आहे. ही देवी गुहेत असून, देवीची मूर्ती भव्य व अत्यंत तेजस्वी आहे. आठ फूट उंचीची - अठरा हातांची ही देवी दर्शनार्थींना प्रसन्नता देणारी आहे.या स्थानापर्यंत पोचण्यास नांदुरीमार्गे ४७५ व वणीमार्गे ३५० दगडी पायर्‍या चढून जाव्या लागतात.

हा डोंगर म्हणजे सह्याद्री पर्वताचा एक भाग असून, येथे मार्कंडेय ऋषीने तपश्चर्या केली होती. ह्या डोंगराला सात शिखरे आहेत, म्हणून याला सप्तश्रृंग असे म्हणतात. ह्या देवीच्या क्षेत्राविषयी शिवकालीन कागदपत्रांत, श्रीरामदास स्वामींच्या उल्लेखात, तसेच पेशवेकालीन, कागदोपत्री निर्देश आढळतो. ह्या परिसरात कालीकुंड, सूर्यकुंड, दत्तात्रयकुंड ही तीन मोठी कुंडे असून, सरस्वती, लक्ष्मी, तांबुल, अंबालय व शीतला अशी पाच छोटी कुंडे आहेत. श्रीसिद्धेश्वर मंदिरही आहे. दर्शनार्थी भाविकांसाठी येथील ट्रस्टमार्फत सोयी उपलब्ध केल्या गेल्या आहेत.