One day trip - "Visava Resort", Panvel - Sunday 16th November 2025

Back to Programs

एक दिवसीय सहल "विसावा रिसॉर्ट", पनवेल, रविवार १६ नोव्हेंबर २०२५ (चित्पावन फाउंडेशन नवी मुंबई तर्फे आयोजित)

चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई आपल्या ज्ञातीच्या लोकांसाठी वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असते.

चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई, चित्पावन फाउंडेशनच्या ऑब्जेक्टिव्हज नुसार आपल्या ज्ञातीच्या लोकांनी अनेक पातळ्यांवर प्रगती करण्यासाठी तसेच मेंबर्सचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी योजना आखत असते व राबवित असते. त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायाच्या दैनंदिन धावपळ, दगदगीतून आपल्या ज्ञातीच्या लोकांना विरंगुळ्याचे, खेळीमेळीचे चार क्षण एकत्र अनुभवता यावे म्हणून ह्या सहलीचे प्रयोजन असते. 

ह्या वर्षीच्या सहलीसाठी पनवेल जवळ "विसावा रिसॉर्ट" ची निवड करण्यात आली होती. सकाळी साधारण ७:३५ वाजता घणसोली येथून बस निघाली. ४४ सभासद ट्रीप साठी आले होते. ट्रीपचे हे चौथे वर्ष होते. मागील तीन वर्षी ट्रिपला येणाऱ्या मेंबर्स चा आकडा पाहिल्यास ह्या वर्षीचा रिस्पॉन्स जरा कमी होता. पहिल्या वर्षी म्हणजे २०२२ डिसेंबर मध्ये ५५ लोक ट्रीपला आले होते, २०२३ मध्ये साधारण ७५ लोक आले होते आणि मागच्या वर्षी २०२४ डिसेंबर मध्ये ९० लोक ट्रीप ला आले होते. 

साधारण पावणेदहा वाजता बस रिसॉर्टला पोहोचली. मग फ्रेश होऊन ब्रेकफास्ट व चहाची सोय करण्यात आली होती. ह्यामध्ये तर्रीदार मिसळ पाव व उपमा असा मेनू होता. मग पोट पूजा झाल्यावर ज्यांना वॉटर राईडस, रेन डान्स करण्यात स्वारस्य होते किंवा ज्यांना फेरफटका मारायचे असेल त्यांना आपापल्या आवडीप्रमाणे वेळ देण्यात आला होता. काही मंडळींनी छान पैकी नव्या ओळखी करून घेतल्या तर काहींनी गप्पा टप्पा, पत्ते खेळण्याचा आनंद घेतला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या सहलीसाठी वय वर्षे दीड ते ९३ इतक्या वयोगटातील मंडळी हजर होती.

मग साधारण एक-सव्वा च्या सुमारास सर्वांनी सुग्रास चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. त्यात गरमागरम जिलेबी, पनीरची मिक्स भाजी, रोटी, डाळ भात, सलाड, सुमधुर ताक अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. 

जेवण झाल्यावर प्रसन्न जोग ह्यांनी हाउजी खेळ आयोजित केला होता; त्यात सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यात विविध टप्पे पूर्ण करणाऱ्या तसेच Full Housie सर्वात आधी पूर्ण करणाऱ्या तीन स्पर्धकांना चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई तर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली. 

त्यानंतर आपल्या Next Generation पैकी कु. तन्वी भातखंडे हिने आपल्या ज्ञातीच्या लोकांनी एकजूट ठेवणे तसेच ज्ञातीच्या लोकांसाठी कार्य करत राहणे किती गरजेचे आहे हे अनेक संदर्भांसहित सभाधीटपणे कथन केले. त्याबद्दल तिचे कौतुक केले पाहिजे. Next Generation च्या अशा सहभागामुळे हल्लीची पिढी आपल्या ज्ञातीच्या लोकांबद्दल फारशी दखल घेत नाही; असा सर्वसाधारण गैरसमज दूर होण्यास मदत होईल. 

त्यानंतर कोअर कमिटीतर्फे विविध प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सौ. सायली व श्री. संतोष नेने, सौ. आरती व श्री. शशांक चितळे, श्री. प्रसन्न जोग, तसेच Next Generation च्या  तन्वी भातखंडे, पूर्णो रेखी, ध्रुव नेने, श्रेयस परांजपे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र, तसेच जोडप्यांसाठी सुद्धा विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. त्यात सर्व उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यातही विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या स्पर्धकांना फौंडेशन तर्फे वैविध्यपूर्ण बक्षिसे देण्यात आली. 

त्यानंतर संध्याकाळी ४:३०-५:०० च्या सुमारास सर्वांनी पावभाजी आणि वाफाळत्या चहाचा आस्वाद घेतला. त्यानंतर सर्व उपस्थितांचे फोटो काढण्यात आले. संध्याकाळी अंदाजे सहा वाजता सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. 

अशा रीतीने आपल्या ज्ञातीच्या नवनवीन लोकांशी ओळखी होतात व एकमेकांशी असलेले संबंध दृढ होतात. सर्व वयोगटाच्या लोकांनी आपल्या कुटुंबीय तसेच चित्पावन फौंडेशन , नवी मुंबई च्या मित्रपरिवारासोबत निकोप व खेळकर पद्धतीने वेळ घालवल्यामुळे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

© 2025 Chitpavanfoundation.org - All rights reserved.