ग्राहक राजाला खुश करण्यासाठी आणि सगळ्यांना आनंद देणाऱ्या दिवाळीच्या सणाची जय्यत तयारी करायला वाव देण्यासाठी एक बहारदार प्रदर्शन आणि विक्री चित्तपावन फौंडेशन नवी मुंबई तर्फे नवी मुंबई वाशी येथे २७, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. ग्राहकाला राजा असं का संबोधलं जातं ह्याचा प्रत्यत आम्हा सर्वांना पदोपदी येत होता. चित्तपावन फौंडेशन तर्फे हा पहिलाच प्रयत्न होता आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला हे सांगताना आम्हाला अत्यानंद होतो आहे. उराशी एक स्वप्न बाळगून फौंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी अक्षरश: रात्रंदिवस काम केले. तमिळ संघम, वाशीच्या सुसज्ज हॉल मध्ये आयोजित हे प्रदर्शन आणि विक्री म्हणजे अनेक रंग, गंध आणि चवींची उधळण होती. दिवसभर काम करून थकून भागून आपण आपल्या घरी परत येतो. ह्या घरात आपल्या अनेक भावना आणि आठवणी गुंतलेल्या असतात. तुमचं हेच घर सुरेख दिसावं म्हणून शोभेच्या अनेक वस्तू आम्ही येथे उपलब्ध केल्या होत्या. महिला वर्गाची कपड्यांची आणि दागिन्यांची हौस तर जगजाहीर आहे. त्यांच्या ह्याच आवडीचा विचार करून तयार कपडे आणि दागिने उपलब्ध होते. स्त्री चे सौंदर्य आणि त्यातही भारतीय स्त्री चे सौंदर्य साडीतच खुलून दिसते, ह्यासाठीच आमच्या महिला विक्रेत्यांनी उत्तमोत्तम साड्या अगदी वाजवी दरात उपलब्ध केल्या. तुमच्या पाककलेला वाव मिळावा म्हणून तुमच्यासाठी विविध प्रकारची तयार पीठेही उपलब्ध होतीच शिवाय आबालवृद्ध सर्वांसाठी खाद्यपदार्थ उपलब्ध होते. दिवाळीची तयारी करताना फराळाला विसरून कसे चालेल म्हणूनच तयार फराळ उपलब्ध होताच पण दिवाळीत आपल्या आप्तस्वकीयांना भेट वस्तू देण्यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध होते. रंगासोबत गांधाचीही उधळण विविधाने केली. उत्तम वासाची अत्तरे आणि घर सुगंधी ठेवण्यासाठी विविध वस्तू येथे उपलब्ध होत्या. वाचाल तर वाचाल हे ब्रीद वाक्य लक्षात ठेऊन आम्ही अनेक विषयांवरची पुस्तके उपलब्ध केली होती. इतकी खरेदी केल्यावर पोटोबा करणे ओघाने आलेच. असे म्हणतात ब्राह्मणा: भोजन प्रिया: म्हणजे ब्राह्मणांना भोजन आवडते, पण फक्त स्वत: खायलाच नाही तर दुसऱ्यांना खिलवायालाही आवडते आणि म्हणूनच तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अत्यंत निगुतीने आणि स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेऊन उत्तमोत्तम पदार्थांची रेलचेल विविधामध्ये होती. सुट्टीसाठी कुठे बर जायचं? ह्या प्रश्नाच उत्तरही आमच्या विविधामध्ये होतं. सर सलामत तो पगडी पचास हे तर आपल्या सर्वांनाच पटेल. म्हणूनच जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी अशा अनेक योजनांमध्ये गुंतवणूक कशी करावी ह्याचे मार्गदर्शन विविधाने केले. शेवटी आपण हे सगळे कशासाठी करतो तर आत्मसमाधानासाठी. आत्मशांती शिकवणारे ब्रह्मविद्येचे ज्ञान सर्वांना मिळावे ह्याचीही काळजी विविधाने घेतली. त्या विधात्याला ह्या सर्वात विसरून कसे चालेल? त्याचे अधिष्ठान असले तर सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडते म्हणूनच पूजा सामग्रीचे ही आयोजन केले गेले.
विविधा ग्राहक पेठ ही अनेक नव्या जुन्या व्यावसायिकांना एकत्र आणणारी ठरली. एक सुरेख कुटुंब तयार झाले जिथे मोठ्यांचे मार्गदर्शन आणि समवयस्क लोकांची साथ मिळते. प्रामाणिक प्रयत्नांचे तितक्याच प्रामाणिकपणे कौतुकही होते. नव्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारी अनेक मंडळी आजूबाजूला होतीच पण ग्राहकांनीही उदंड प्रतिसाद दिला. अत्यंत चोख व्यवस्था कार्यकर्त्यांनी ठेवली आणि विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही ह्याची दक्षता घेतली. जाहिरात ही पासष्ठावी कला मानली जाते आणि म्हणूनच विविधा ग्राहक पेठेची यथोचित आणि दणक्यात जाहिरात केली गेली त्याचा चांगला फायदा सर्वच व्यावसायिकांना मिळाला. के. पी. लॉजीस्टीक्स चे पार्टनर श्री. सुहास खाडिलकर आणि कॉसमॉस बँकेचे संचालक सी. ए. श्री जयंत बर्वे ह्यांनी आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून कार्यक्रमाचे उद्घाटन तर केलेच शिवाय आमच्यासारख्या नव्या जुन्या व्यावसायिकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शनही केले. इतकेच नाही तर विविधाच्या यशासाठी भरघोस मदतही केली. त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आणि म्हणूनच त्यांच्या ऋणात रहाणेच आम्ही पसंत करू.
योजका: दुर्लभा: असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. परंतु चित्तपावन फौंडेशन ह्याला अपवाद आहे. ह्या आधी झालेल्या कार्यक्रमांच्या एक पाउल नव्हे तर दहा पावले पुढे जात प्रसन्न जोग, प्राची साठे, कौस्तुभ गोखले, आमोद ताम्हणकर, प्रतिक साठे, निशिकांत आणि प्राजक्ता परांजपे ह्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थ खांद्यांवर हे शिवधनुष्य पेलले आणि अथक परिश्रमाने रात्रंदिवस काम करून विविधा ग्राहक पेठ यशस्वी करून दाखवली. इतर सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना मोलाची आणि खंबीर साथ दिली. वाशी, नेरूळ, खारघर, कोपरखैरणे आणि अगदी पनवेल येथून ग्राहक आले, मनासारखी खरेदी करून समाधानाने परत गेले आणि अगदी दुसर्या दिवशीही सर्व विक्रेत्यांना फोन करून संपर्क साधून कौतुकाचा वर्षाव केला हीच आम्ही आमच्या कामाची पावती समजतो. पुढच्या ग्राहक पेठेत नक्की भेटू .... लवकरच .....