आपल्या ज्ञाती मधल्या बंधू भगिनींच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी तसेच उद्योजक / व्यावसायिकांमध्ये परस्परांशी ओळख वाढावी, व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून चित्पावन फौंडेशन प्रयत्नशील असते.
बरेचदा नव्याने उद्योग व्यवसायात पदार्पण करणाऱ्या बंधू भगिनींना एक व्यासपीठ मिळणे, मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते; त्या दृष्टीने फौंडेशनचा असा प्रयत्न असतो कि अशा उभरत्या उद्योग व्यावसायिकांसाठी जास्तीतजास्त संधी उपलब्ध करून देता येतील.
त्या दृष्टीने चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चे कोअर कमिटी चे सभासद नवनवीन कल्पना लढवत असतात आणि त्यांचा पाठपुरावाही करत असतात.
त्याप्रमाणे चित्पावन फौंडेशन, नवी मुंबईने ह्या वर्षी म्हणजे २०२४ च्या १८, १९ आणि २० ऑक्टोबर रोजी मागच्याच वर्षीच्या म्हणजे "तामिळ संघम हॉल", वाशी, नवी मुंबई येथे सकाळी १० ते रात्री ९ अशा वेळेत विविधा - ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले होते.
"विविधा" ग्राहक पेठेचे २०२४ हे दुसरे वर्ष होते. पहिल्या वर्षीचा दमदार प्रतिसाद पाहता आणि संभाव्य स्टॉल धारकांची वाढती संख्या लक्षात घेता मागच्या वर्षी बुक केलेल्या २ ऐवजी तीनही माजले आरक्षित करण्याचे योजले होते. अपेक्षेप्रमाणे स्टॉल धारक आणि ग्राहकांनीही हा अंदाज खरा ठरवला, हे मिळलेल्या जोरदार प्रतिसादावरून सिद्ध झाले.
हॉल बुकिंग पासून ते स्टॉल ग्राहक आणि व्यावसायिक बंधू - भगिनींसाठी सुसज्ज करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, अशा सर्व बाबींची चोख व्यवस्था करण्यात आली होती. कोअर कमिटी च्या कार्यकर्त्यांनी अनेकदा समक्ष भेटून, चर्चा करून समन्वयाने “विविधा” ग्राहक पेठेची उत्तम तऱ्हेने आखणी केली होती. उद्योजक व्यावसायिक बंधू भगिनींचा भरपूर मोठ्या प्रमाणात व्यवसाय व्हावा ह्या दृष्टीने नव्या मुंबईत ठिकठिकाणी तसेच वेगवेगळ्या माध्यमातून जसे वर्तमानपत्र, कापडी बॅनर, तसेच अद्ययावत अशा डिजिटल मीडिया, व्हाट्स अँप, फेसबुक वगैरे माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली होती.
त्याचबरोबर वेळोवेळी झालेल्या कमिटीच्या मिटींग्स मध्ये हॉल बुकिंग, जास्तीतजास्त प्रमाणात किती स्टॉल बसवता येतील त्याचा लेआऊट, उद्योग व्यावसायिकांना डोईजड होईल असे भाडे न आकारता परवडेल अशा खर्चात कसे उपलब्ध करून देता येतील, जाहिरात खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्पॉन्सरशिप मिळवणे, जाहिरातीसाठी बॅनर मिळवणे, इत्यादी अनेक गोष्टींचा साकल्याने विचार केला होता.
ह्या वर्षीच्या "विविधा" साठी चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई ला वामन हरी पेठे ज्वेलर्स ह्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध ब्रँड चे युवा पिढीचे प्रतिनिधी श्री. नील पेठे ह्यांनी ‘टायटल स्पॉन्सरशिप’ म्हणून दोन लाख रुपयांची देणगी दिली. तसेच "जाई काजळ" ह्या जवळपास ७० वर्षे लोकप्रिय व सुप्रसिद्ध ब्रँड चे सर्वेसर्वा श्री. राजेश गाडगीळ ह्यांनी को-स्पॉन्सरशिप म्हणून पन्नास हजार रुपयांची देणगी दिली. तसेच ह्या उपक्रमासाठी ‘हेक्सागॉन नुट्रीशन’ चे श्री. अरुण केळकर, फोटोग्राफीचा व्यवसाय असलेल्या सौ. वीणा गोखले, ठाणे, ‘ठाणे जनता सहकारी बँक’ ह्यांनी बॅनर / देणगी स्वरूपात निधी दिला.
"वामन हरी पेठे ज्वेलर्स" ची टायटल स्पॉन्सरशिप मिळविण्यासाठी श्री. संतोष नेने, डॉ. सौ. रसिका व डॉ. श्री. विलास ताम्हनकर ह्यांनी तसेच "जाई काजळ" ची को-स्पॉन्सरशिप मिळविण्यासाठी श्री. शशांक चितळे व श्री. वसंत मोडक (ठाणे) ह्यांची मोलाची मदत झाली.
ह्या सर्व स्पॉन्सरशिप्स मिळवण्यासाठी तसेच जास्तीतजास्त इच्छुक उद्योजक / व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोअर कमिटी च्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
त्याचप्रमाणे, संबंधित अधिकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करून असे ठरवण्यात आले कि चित्पावन ब्राह्मण ज्ञाती बरोबरच इतर ब्राह्मण समाजाच्या हिताचा सर्वसमावेशक पद्धतीने विचार करून त्यांनाही "विविधा" ग्राहक पेठेत स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे. त्यामुळे अधिक विशाल दृष्टिकोनातून समस्त ब्राह्मण वर्गाच्या उन्नतीसाठी आपल्या संस्थेला समाजात एक चांगले उदाहरण बनून राहता येईल.
तळ मजल्यावर ३६, पहिल्या मजल्यावर १४ व दुसऱ्या मजल्यावर खाद्य पदार्थांचे ३ असे स्टॉल्स होते. काही स्टॉल्स सिंगल टेबलं तर काही L स्वरूपात होते. अनेकविध वस्तू, सेवा पुरवणारे उद्योगजक, व्यावसायिक ह्यात समाविष्ट होते. जसे कि पुस्तके, पर्सेस, बॅग्स, औद्योगिक भेटवस्तू, पूजा साहित्य, साड्या, दिवाळी फराळ, पीठे, फ्रिज मॅग्नेट, ऑरगॅनिक हळद, साबण उटणी, रांगोळ्या, दिवे, तेल, क्रोशाची खेळणी, एम्ब्रॉयडरी प्रॉडक्ट्स, बेडशीट्स, कोकण मेवा, आंब्याचे विविध पदार्थ, लोणची, कुंड्या, इको टूरीजम, ट्रॅव्हल टूर, कार सर्व्हिसिन्ग, पेन्टिंग्स, ज्वेलरी, गुंतवणूक, इन्शुरन्स, पेन्टिंग्स, श्रीखंड, इत्यादी. तसेच चविष्ट व रुचकर असे अनेक ताजे खाद्य पदार्थ तयार करून देणारे स्टॉल्स ही होते.
शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई तर्फे प्रास्ताविक करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या, वामन हरी पेठे जेवलर्स च्या श्री. नील पेठे ह्यांच्या हस्ते “विविधा” ग्राहक पेठेचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. भगवान श्रीपरशुरामांच्या तसबिरीला हार घालण्यात आला. श्री. नील पेठे ह्यांना संस्थेतर्फे मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. नील पेठे तसेच ज्येष्ठ सदस्य डॉ. श्री. विलास ताम्हनकर व डॉ. सौ. रसिका ताम्हनकर, तसेच सौ. सानिका व डॉ. श्री. आमोद ताम्हनकर, श्री. कौस्तुभ गोखले, सौ. प्राची व श्री प्रतीक साठे, सौ. माधवी गानू ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व उपस्थितांना पेढे देऊन तोंड गोड करण्यात आले. "विविधा" चे को स्पॉन्सर "जाई काजळ" च्या श्री. राजेश गाडगीळ ह्यांना संस्थेतर्फे मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मान्यवरांनी अतिशय आत्मीयतेने आणि वेळात वेळ काढून सर्व स्टॉल्स ना भेट दिली तसेच स्टॉल धारकांशी सुसंवाद साधला. स्टॉल धारकांच्या वस्तू व सेवांविषयी जाणून घेतले. त्यामुळे सर्व उद्योजक, व्यावसायिकांचे मनोधैर्य उंचावले.
तिन्ही दिवस "विविधा" ग्रह पेठेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला; त्यात पनवेल पासून ठाण्या पर्यंत अनेक भागातले लोक आले होते. तसेच मागील वर्षी पेक्षा संख्येतही लक्षणीय वाढ झालेली दिसली. त्यावरून ह्या उपक्रमा बद्दल जनमानसात प्रतिबिंबित होत चाललेली उज्वल प्रतिमा तसेच जाहिराती, डिजिटल माध्यमे तसेच मौखिक प्रसिद्धी माध्यमांद्वारे होत असलेले चांगले परिणाम दृश्य स्वरूपात पाहायला मिळाले. तर अशा पद्धतीने कोअर कमिटी च्या सर्व मेंबर्सच्या अथक परिश्रमांमुळे व अनेकांच्या प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हातभाराने चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चा हा उपक्रम लक्षणीय दृष्ट्या यशस्वी झाला. अजून एक महत्वाची गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे कि चित्पावन फौंडेशन च्या मुख्य कार्यकारिणीच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनाशिवाय हे शक्य झाले नसते, असे म्हणले तर अवास्तव होणार नाही. श्री. प्रमोद लेले सरांनी "विविधा" मध्ये स्वतः उपस्थित राहून कोअर कमिटी च्या अशा उपक्रमांचे केलेले कौतुक हे उद्योग व्यावसायिकांच्या तसेच कोअर कमिटी च्या सर्व सभासदांना मिळालेली चांगल्या कामाची पावतीच आहे.
कुठल्याही स्टॉल वर रुपये ५०० च्या वर खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक वेळी एक "लकी ड्रॉ" कुपन देण्यात येत होते ज्यांची व्यवस्था संस्थेने करून दिली होती. यामागे केवळ स्टॉल धारकांचा व्यवसाय वाढावा ह्यासाठी अशी आकर्षक योजना आखण्यात अली होती. प्रत्येक दिवशी लॉटरी पद्धतीने तीन बक्षिसे जाहीर केली गेली आणि विजेत्यांना ज्या त्या दिवशी देण्यात आली.
"विविधा" यशस्वी होण्यासाठी कोअर कमिटी च्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहेनत घेतली. सौ. प्राची व श्री प्रतीक साठे ह्यांनी स्टॉल्स च्या बुकिंग संबंधी सर्व जबाबदारी सांभाळली. तसेच अनेक लोकांशी संवाद साधून शंकांचे समाधानकारक निराकरण करणे, स्टॉल्स चा लेआऊट डिजाईन करणे त्यात जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने स्टॉल्स कसे बसवता येतील ते पाहणे, बुकिंग केलेल्या स्टॉल धारक आणि कोअर कमिटी मधील दुवा म्हणून काम करणे अशी अनेक महत्वाची कामे पार पाडली.
त्याच बरोबर श्री. संतोष नेने, सौ.सानिका व श्री. आमोद ताम्हनकर, सौ. माधवी व श्री. मिलिंद गानू, श्री. प्रसन्न जोग, श्री अभि गद्रे ह्यांनी “विविधा” साठी हॉल ची पाहणी, त्यासंबंधित कंत्राटदारांबरोबर चर्चा करणे, स्टॉल उभारण्याच्या दृष्टीने करायची कामे, स्टॉल धारकांना चहा पाण्याची व्यवस्था, परगावहून येणाऱ्या स्टॉल धारकांची राहण्याची व्यवस्था, जाहिरात व्यवस्थापन, कायदेशीर परवानग्या इत्यादी अनेक कामे पार पाडली.
सौ. प्राजक्ता आणि श्री. निशिकांत परांजपे ह्यांनी “विविधा” संबंधित कार्यक्रम पत्रिका, लोगो, बॅनर, प्रिंटिंग मटेरियल, बॅजेस, कुपन्स इत्यादी अनेक जबाबदाऱ्या उचलल्या. तसेच कोअर कमिटीच्या इतर सभासदांचाही अनेक कामांमध्ये हिरीरीने सहभाग होता; जसे "विविधा" ग्राहक पेठे बद्दल जास्तीतजास्त लोकांपर्यंत माहिती पोचावी ह्यासाठी प्रयत्न करणे, स्टॉल्सची उभारणी, बॅनर लावणे, हॉल चे सुशोभीकरण, पंख्यांची व्यवस्था, तिन्ही दिवस स्टॉल धारकांना पाण्याच्या बाटल्या पुरवणे, चहाची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सिक्युरिटी व्यवस्थापन, गिफ्ट कुपन्स चे व्यवस्थापन इत्यादी. सौ. स्नेहा व श्री. मंदार लिमये हे कोअर कमिटी मध्ये नसूनही स्वेच्छेने "विविधा" साठी कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते व ग्राहकांच्या नोंदणीचे काम त्यांनी तिन्ही दिवस पाहिले, ह्याचा विशेष उल्लेख करावा लागेल. अशा स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संस्थेकडून कायम स्वागतच आहे .
"विविधा" मधल्या सर्व स्टॉल धारकांचा लक्षणीय अशा प्रमाणात व्यवसाय झाला तसेच अनेक नव्या ओळखी झाल्या; ज्याचा उपयोग भविष्यात त्यांच्या उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी नक्कीच होईल
तसेच सर्व आवश्यक त्या सुविधा योग्य वेळेत आणि विना सायास उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्टॉल धारकांनी चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई चे मनापासून आभार मानले. तसेच भविष्यात अशी संधी उपलब्ध करून दिल्यास अवश्य लाभ घेऊ असे आग्रहाने आश्वासनही दिले.
त्याप्रमाणे ग्राहकांनीही एकाच छताखाली अतिशय दर्जेदार गुणवत्ता असलेल्या वस्तू व सेवा रास्त किंमतीत उपलब्ध करून दिल्याबद्दल चित्पावन फौंडेशन, नवी मुंबई ला मनापासून धन्यवाद दिले.